गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला अन् मोठा राडा झाला; जळगावमधील पाळधीत दगडफेक, जाळपोळ आणि संचारबंदी
संपूर्ण जग इंग्रजी नववर्षाचे स्वागत करत असताना जळगाव जिल्ह्यातील पाळधीमध्ये मोठा राडा झाला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि कट मारल्याच्या कारणातून दोन गट एकमेकांशी भिडले. संतप्त जमावाने गावात दगडफेक करत दहा ते बारा दुकानांना आग लावली. वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली आणि मोठा फौजफाटा तैनात केला. सध्या पाळधी गावामध्ये गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून दगडफेक, जाळपोळ करणाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितले.
31 डिसेंबरच्या रात्री काय घडलं?
माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबीयांना घेऊन ड्रायव्हर जात होता. याचवेळी पाळधी गावाजवळ मोठ्याने हॉर्न वाजवत गाडीला कट मारण्याच्या वादातून वादाला सुरुवात झाली. वाद वाढत गेल्याने गावातील तरुण आणि गुलाबराव पाटलांचे समर्थकही तिथे पोहोचले. शाब्दिक वाद पुढे हाणामारीपर्यंत पोहोचला आणि यातूनच दगडफेक, जाळपोळ झाली. जमावाने तब्बल दहा ते बारा दुकाने आणि गाड्यांना आग लावली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
गावात तणावपूर्ण शांतता
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी दुकानं, गाड्यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गावात गस्तही घातली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत 20-25 जणांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. सध्या गावात संचारबंदी लागू असल्याने तणावपूर्ण शांतता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List