New Year 2025 – नववर्षाच्या स्वागताचा शहरभर जल्लोष
सरत्या वर्षाला निरोप देत पुणेकरांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत, संगीताच्या तालावर थिरकत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, गुडलक चौक, कॅम्पमधील महात्मा गांधी रस्त्यावर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. मध्यरात्री 12च्या ठोक्याला ठिकठिकाणी जमलेल्या तरुणांनी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून ‘हॅपी न्यू इयर’च्या घोषणा देत नववर्षाचे स्वागत केले. अनेकांनी नववर्षानिमित्त विविध संकल्प करून ते पूर्ण करण्याचा निश्चयही केला.
शहर आणि उपनगरांच्या विविध भागांमध्ये मंगळवारी संध्याकाळपासून ‘न्यू इयर’च्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. संध्याकाळी शहरातील रस्त्यांवर ठिकाणी तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. फग्र्युसन आणि जंगली महाराज रस्त्यावर जमलेल्या तरुणाईने मध्यरात्री १२चा ठोका पडताच फटाक्यांची आतषबाजी करीत आणि आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. याबरोबरच अनेकांनी आपआपल्या घरी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा बेत आखून नववर्षाच्या जल्लोष साजरा केला. काहीजणांनी शहरानजीकच्या निसर्गरम्य वातावरणात फार्महाऊस बुक करून त्या ठिकाणी कुटुंबीयांसोबत नव्या वर्षाचे स्वागत केले.
अनेक सामाजिक-राजकीय घटनांचे साक्षीदार ठरलेल्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत मोठ्या प्रमाणात पुणेकर बाहेर पडल्यामुळे शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कॅम्पमधील महात्मा गांधी रस्ता यांसारख्या प्रमुख रस्त्यांबरोबरच शहर व उपनगर परिसरातील रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीने गजबजले होते. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण सेल्फी काढण्यात दंग झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
800 टन चिकन अन् 40 टन मासळी फस्त
नववर्ष स्वागतासाठी मासळी, मटण, चिकन खरेदीसाठी सामिष खवय्यांची बाजारात गर्दी झाली होती. मार्गशीर्ष महिन्याची सोमवारी सांगता झाल्यानंतर खवय्यांनी रांगा लावून खरेदी केली. हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. खवय्यांनी शहर आणि परिसरात हजारो किलो मटण, ७०० ते ८०० टन चिकन आणि ३० ते ४० टन मासळी फस्त करून आनंद साजरा केला.
मंगळवारी सकाळपासून शहर, तसेच उपनगरांतील बाजारात मासळी, मटण, चिकन खरेदीसाठी सामिष खवय्यांची गर्दी झाली होती. हॉटेल व्यावसायिक, घरगुती ग्राहकांकडून मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजारात सकाळपासून खवय्यांची गर्दी होती. कसबा पेठेतील मटण मार्केट, लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट, फर्ग्युसन रस्त्यावरील वीर चापेकर मार्केट परिसरात गर्दी झाली होती. तसेच पौड फाटा, विश्रांतवाडी, पद्मावती येथील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीला चांगली मागणी होती. खवय्यांकडून पापलेट, कोळंबी, सुरमई, रावस, हलवा, ओले बोंबील या मासळीला चांगली मागणी होती. मासळीला मागणी वाढल्याने दरात 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे गणेश पेठेतील मासळी बाजारातील ठाकुर परदेशी यांनी सांगितले.
पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे प्रभाकर कांबळे म्हणाले, ‘मार्गशीर्ष महिन्यात अनेकजण सामिष पदार्थ वर्ज्य मानतात. मार्गशीर्ष महिन्याची सोमवारी सांगता झाल्यानंतर सामिष खवय्यांची मंगळवारी सकाळपासून मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी झाली होती. घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडून मटणाला चांगली मागणी होती.’ पुणे, पिंपरी शहर बॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी म्हणाले, ‘केटरिंग व्यावसायिक, हॉटेलचालक, तसेच घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List