शहापूर, मुरबाडच्या 118 शेतकऱ्यांना पीक विम्याची फुटकी कवडीही दिली नाही, इन्श्युरन्स कंपनीने दोन कोटी लटकवले
अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा मोठा फटका शहापूर व मुरबाड तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला. त्यानंतर पंचनामे झाले, जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवालही पाठवला. त्यास चार महिने उलटून गेले तरी 118 शेतकऱ्यांना पीक विम्याची फुटकी कवडीही मिळालेली नाही. एचडीएफसी अॅग्रो इन्शुरन्स कंपनीने या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे तब्बल दोन कोटी रुपये लटकवून ठेवले आहेत. त्यामुळे शहापूर, मुरबाडमधील शेतकरी कमालीचे संतापले असून हेच का बळीराजाचे सरकार, असा सवाल करण्यात आला आहे.
मुरबाड तसेच शहापूर तालुक्यातील शेतकरी भात पिकांबरोबरच गेल्या काही वर्षांपासून आंब्याचे उत्पादनदेखील घेत आहेत. हापूस आंब्याची लागवड करण्यात आली असून पूरक पीक म्हणून या आंब्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. मात्र चार महिन्यांपूर्वी आलेला अवकाळी पाऊस आणि बदललेले हवामान याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला. शहापूरमधील 53 व मुरबाडमधील 65 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी अॅग्रो इन्शुरन्स कंपनीकडे विमा काढला. शंभर आंब्यांच्या झाडांमागे 21 हजार 700 रुपये भरले. एकूण शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा विमा काढला.
अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत या मागणीसाठी आंबा उत्पादक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापि त्याची दखल घेतलेली नाही. दरम्यान सरकारकडूनच आम्हाला पैसे मिळाले नसल्याचा दावा एचडीएफसी अॅग्रो इन्शुरन्स कंपनीने केला आहे. दोन महिने आम्ही प्रयत्न करीत आहोत पण अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे उमेश धानके या शेतकऱ्याने सांगितले.
■ अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकाची अक्षरशः वाट लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पंचनामे केल्यानंतर पीक विम्याचे पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण वर्ष संपत आले तरी दोन कोटी रुपयांची रक्कम मिळालेली नाही.
■ शहापूर व मुरबाड तालुक्यातील बागा उत्पादक शेतकऱ्यांना शंभर झाडांमागे 2 लाख 35 हजार रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनदेखील हक्काचा विमा देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List