रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून आता राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. रेणापूरमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मोर्चा निघाला होता, या मोर्चामध्ये जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली, यावर आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
सरकार कोणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलतात तेव्हा कारवाईच करतात. कोर्टात टिकेल अशापद्धतीनं कारवाई होणार, दोषी कितीही मोठा असला तरी शिक्षा होईल, सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीनं तपास सुरू आहे, मुख्य सूत्रधाराला शिक्षा झाली पाहिजे. मोर्चा काढणे जनतेचा अधिकार आहे, सरकार म्हणून आम्ही योग्य पद्धतीनं काम करत आहोत.
दरम्यान आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला होता, सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात सुपारी घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस भावना व्यक्त करत आहेत, मी याबाबत धस यांच्याशी बोलेल. सुरेश धस यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा माझ्याशी बोललं पाहिजे. मात्र काही गोष्टी सार्वजनिक रुपात आल्या तर घटनेच्या तपासाला अडचण निर्माण होईल, त्यामुळे असे वक्तव्य करू नये, असा सल्ला बावनकुळे यांनी धस यांना दिला आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते.
दरम्यान शिर्डीत 12 जानेवारील भाजपचे राज्यस्थरीय अधिवेशन आहे, या अधिवेशनावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशन शिर्डीत व्हावे अशी पक्षाची इच्छा होती.
महाराष्ट्राच्या विकासाचे ठराव अधिवेशनात पारीत होतील असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List