किस्से आणि बरंच काही – मैत्रीचा आनंददायी प्रवास
<<<धनंजय साठे>>>
महाराष्ट्राचे लाडके कलाकार शाहीर साबळे यांची कन्या चारुशीला. अभिनय व नृत्य कौशल्याने एक काळ गाजवलेली हरहुन्नरी अभिनेत्री चारुशीला आणि माझी पहिलीवहिली ओळख झाली ती नाट्यगृहात. तिथून सुरू झालेला आमच्या मैत्रीचा प्रवास आजही तितकाच आनंददायी आहे.
अनेक वर्षांपूर्वी मी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमिता खोपकर प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे एका नाटकाचा प्रयोग पाहायला गेलो होतो. प्रयोग नुकताच सुरू झाला होता. अंधाराला डोळे सरावल्यावर मी अमिताताईंच्या बाजूला एक ओळखीचा चेहरा बसल्याचं पाहिलं. तेवढ्यात अमिताताईंचंही लक्ष गेलं. प्रयोग चालू होता. त्यातून पहिल्याच रांगेत बसलेलो असल्याने अमिताताईंनी बाजूच्या व्यक्तीचा हात हातात घेतला. साहजिकच माझ्या लक्षात आलं की, या दोघी खास मैत्रिणी असणार. थोड्या वेळाने पहिला अंक संपला आणि माझी नजर त्या व्यक्तीकडे गेली. आमच्या बाजूला बसलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या अभिनय व नृत्य कौशल्याने एक काळ गाजवलेली हरहुन्नरी अभिनेत्री चारुशीला साबळे वाच्छानी होती. ही तिची माझी पहिली ओळख होती!
विलक्षण गुणी अभिनेत्रीशी पहिलीवहिली ओळख नाट्यगृहात व्हावी यापेक्षा नाट्यमय काय असू शकतं! चारुशीला साबळे आम्हाला घेऊन रंगमंचाच्या मागच्या एका खोलीत घेऊन गेल्या आणि तिथे आमचा मस्त चहा-बटाटेवडे असा चविष्ट नाश्ता झाला. अमिताताईंनी ओळख करून दिल्यावर मोबाइल नंबर शेअर झाले आणि तिथून खऱ्या अर्थाने आमच्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला.
मुंबईमध्येच महाराष्ट्राचे लाडके कलाकार शाहीर साबळे यांची कन्या चारुशीला. शालेय शिक्ष्णानंतर, नृत्यकलेत प्रावीण्य आणि विशेष आवड असल्याने त्यांनी पुढचं महाविद्यालयीन शिक्षण हे नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून पूर्ण केलं. कॉलेजचं शिक्षण चालू असतानाच त्या काळातल्या प्रख्यात नृत्यांगना डा. कनक रेळे यांच्या चारूशीला या पहिल्या शिष्या म्हणून नावारूपाला येऊ लागल्या. त्याच सुमारास चारुशीलाने पंडित उदय शंकर यांचे बंधू सचिन शंकर यांच्या बॅले ग्रुपमध्ये प्रवेश केला. तेव्हा परदेशात त्यांच्या बॅले ग्रुपचे प्रयोग ठरले होते. तेव्हाच नियतीने शुभ संकेत दिला. त्या ग्रुपमध्ये जिती मेनन नावाच्या एक महत्त्वाच्या कलाकार होत्या. ज्यांना काही वैयक्तिक कारणामुळे ऐन वेळी माघार घ्यावी लागली. जिती मेनन यांची जागा घेण्याइतपत कोण सक्षम आहे आणि त्या वेळी जिती मेननने चारुशीलाचे नाव पुढे केले. मग चारुशीला साबळे तब्बल काही महिने स्पेन, इटलीसह अन्य काही देशांत त्या बॅले ग्रुपबरोबर आपल्या नृत्याची चुणूक दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवू लागल्या. कॉलेजचं शिक्षण चालू असतानाच ती स्टार झाली होती.
पुढे शिक्षण घेत असतानाच ‘कमला’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. लालन सारंग, कमलाकर सारंग, विक्रम गोखले, सुधीर जोशी अशा कसलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्यानंतर चारुशीला दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करू लागल्या. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम वडील शाहीर साबळेंबरोबर गाजवला. मराठी रंगभूमी आणि सिनेक्षेत्रासाठी कितीतरी कलाकार या लोकधारेतून निर्माण झाले. त्याच काळात ‘गंमत जंमत’ हा सिनेमा मिळाला…अशोक सराफ यांच्या सोबत. आज इतकी वर्षे उलटूनही चारुशीला साबळे आणि ‘अश्विनी ये ना’चं समीकरण अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे.
उमेदीच्या त्या काळात हिंदी चित्रपटाचे सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते अजित वाच्छानी यांच्याशी लग्नाच्या बेडीत चारू अडकली आणि इथे जन्म झाला चारुशीला साबळे-वाच्छानीचा. पुढे एक गंमत घडली. चारुशीला आणि अजित वाच्छानी हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘हम हिंदुस्थानी’ या टीव्ही मालिकेत काम करत होते. लग्नाला जेमतेम एक महिना होऊन गेला होता. तर त्या मालिकेत एक दृश्य असं होतं, ज्यात अजित वाच्छानीचं पात्र चारूच्या पात्राला ‘भाभी’ असं संबोधून संवाद म्हणतं. हृषीदांना कल्पना होती की, चारू-अजितचं नुकतंच लग्न झालं आहे. दिग्दर्शक आणि माणूस म्हणून ग्रेट असणाऱ्या हृषीकेश मुखर्जी यांनी दोघांना ऑकवर्ड वाटू नये म्हणून तो सीनच काढून टाकला होता. 1992 साली ‘कमला’ नाटक इंग्रजीत करण्यात आलं होतं. तेव्हा डॉ. श्रीराम लागू, रोहिणी हट्टंगडी, निळू फुले, मोहन गोखलेसारख्या मातब्बर कलाकारांबरोबर चारूला काम करण्याचा योग आला होता. नंतर वैवाहिक आयुष्यात चारू छान रमून गेली होती. योहाना आणि त्रिशालासारख्या दोन गोड मुली झाल्या. काही वर्षांनी अजित वाच्छानी यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळाने स्वतःचं दुःख बाजूला ठेवत ‘कॉटन 56 पॉलिस्टर 84’ या नाटकाद्वारे पृथ्वी थिएटरमध्ये पुनःपदार्पण झालं. मग रत्नाकर मतकरी लिखित अशोक सराफ यांच्याबरोबर ‘सुखांत’ या नाटकात काम केलं. या वेळी रंगमंचावर पुन्हा एकदा चारूने अभिनयाला चार चांद लावले.
आज मुली मोठ्या झाल्या आहेत. योहाना गुजराती नाटकांतून नावारूपाला आली आहे. डबिंगच्या क्षेत्रातलं एक प्रस्थापित नाव अशी योहानाची ख्याती आहे, तर त्रिशालाचं लग्न होऊन तिला एक मुलगी आहे. त्रिशाला एका मोठ्या मल्टिनॅशनलमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे. आज चारू आजीच्या भूमिकेत अगदी आनंदाने वावरते. मग ते ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका असो वा आजी, चारू लीलया दोन्ही भूमिका सांभाळते.
या सगळ्यात मला आनंद या गोष्टीचा आहे की, इतकी मोठी अभिनेत्री असूनही अतिशय साधेपणाने, मनमोकळेपणाने ती माझ्याशी बोलते. तिची सुखदुःखं शेअर करते. आपला हक्काचा मित्र म्हणून मान देते. पुढच्या आठवड्यात ती आणि योहाना मला भेटायला खास ठाण्यात येणार आहेत आणि आम्ही एखाद्या छान रेस्टारन्टमध्ये मस्त जेवणावर ताव मारणार आहोत.
[email protected]
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List