जयपूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, अपघात की सरकारचा निष्काळजीपणा? नेमकं काय घडलं?
जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 40 हून अधिक लोक जखमी झाले. यू टर्न घेताना एलपीजी टँकरला केमिकलच्या ट्रकने धडक दिली. यानंतर एलपीजी टँकरच्या नोजलमधून गॅस बाहेर यायला सुरवात झाली आणि पेट्रोलच्या गाड्यांचा भडका उडाला. यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 40 हून अधिक लोक गंभीर भाजले. मात्र ही दुर्घटना खरंच अपघात होता की सरकारचा निष्काळजीपणा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपच्या काळात 2016 मध्ये राष्ट्रीय महामार्ग 8 दिल्ली-अजमेर महामार्गावर रिंग रोड तयार करण्यात आला. यानंतर 2018 मध्ये या रिंग रोडचे उद्घाटन झाले. यानंतर सरकार बदलल्याने रिंग रोडचे काम अर्धवटच राहिले. त्यानंतर नवीन सरकारनेही क्लोअर लीफ बनवले नाही. त्यामुळे अजमेरकडून येणारी वाहतूक वळून दुसऱ्या बाजूने निघून रिंगरोडवर जाते.
2018 पासून आतापर्यंत रिंगरोडच्या क्लोअर लिफसाठी केवळ खांबच उभे आहेत. आता सरकारही बदलले आहे. मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आग्रा-कोटाला जायचे असल्यास रिंगरोडवर जाण्यासाठी येथून यू टर्न घ्यावा लागतो, त्यामुळे दररोज अपघात होतात.
अशाप्रकारे सरकारच्या अपयशामुळेच जयपूरची ही दुर्घटना घडली आहे. हायवेवर यू टर्न घेऊन मुंबई-दिल्ली हायवे, आग्रा, टोंक हायवेवर जाण्याची सक्ती आहे. क्लोव्हर लीफचे काम 2018 मध्ये सुरू झाले, त्या कंपनीला क्लोव्हर लीफचे टेंडर दिले होते ती चार वर्षांपूर्वी काम सोडून पळून गेली. आता NHAI ने या महिन्यात नवीन टेंडरद्वारे 107 कोटी रुपयांचे काम सुरू केले आहे, जे 2026 मध्ये पूर्ण होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List