कल्याण मारहाण प्रकरण; मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी
तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, अशी गरळ ओकत कल्याणमधील ‘अजमेरा हाईट्स’ या उच्चभ्रू सोसायटीत मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरे यांनी कल्याण मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते बोलत होते.
कल्याणमधील घटना संतापजनक आहे. मराठी-अमराठी वाद वाढू लागले आहेत. गेल्या अडीच वर्षातले घटनाबाह्य सरकार आणि आताचे सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देतेय का? दोन अडीच वर्ष मख्ख चेहरा घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्या मिंधेंचे राज्य होते आणि आता भाजप अर्थात ईव्हीएमचे राज्य आहे. या दोघांमध्ये मराठी, महाराष्ट्र द्वेष किती आहे हे आपल्याला दिसते. व्हेज-नॉनव्हेज हा वाद गेल्या दोन अडीच वर्षात जास्त व्हायला लागला. मुंबईमध्ये अनेक वर्षापासून अनेक भाषिक आणि अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. पण हा वाद कधीच नव्हता. जे काही होते ते आपापल्या घरी होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तुमच्या प्रथा, परंपरा वेगळ्या असतील, आमच्या प्रथा, परंपरा वेगळ्या असती. पण व्हेज-नॉनव्हेजवरून वाद होण्याचे कारण काय? मटण, मास खाता म्हणून तुम्ही घाणेरडे झालात असे म्हणणे याचा अर्थ तुमच्या मनात किती द्वेष आहे हे दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी हे जे पार्सल आहे त्या पार्सलला जिथून उचलून आणले तिथे डिपॉट केल पाहिजे. त्याआधी त्याला जेल म्हणजे काय हे दाखवले पाहिजे. तसेच त्याच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
कल्याणमध्ये काल जो वाद झाला त्यालाच जोडून मुंबई किंवा राज्यातील कोणत्याही शहरामध्ये व्हेज-नॉनव्हेज सोसायटी करायचा प्रयत्न कुणी केला तर त्या सोसायटीची ओसी रद्द केली पाहिजे. मराठी माणसाला घर नाकारले तर त्या सोसायटीची ओसी रद्द करून कारवाई झाली पाहिजे. मराठी माणसाला दाबणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुणी दादागिरी करत असेल तर त्याला पोलिसांचा दंडुका काय असतो ते दाखवायला पाहिजे. मुख्यमंत्री महाराष्ट्रप्रेमी असतील तर आमच्या मागणीला मान देऊन महाराष्ट्रद्रोहाचा कायदा आणतील, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई, ठाण्यामध्ये अनेक हाउसिंग सोसायटी त्या भागाचे नाव बदलण्याचाही प्रयत्न करत आहेत. काय तर अपर वरळी, न्यू कफ परेड… कफ तुम्हाला आणि आम्हाला त्याचा खोकला कशाला…. काहीजण शिवरी बोलतात… शिवडी आहे ते. वडाळा, शिवडी, वरळी बोला ना. लाज वाटते का… भाजपने यावर उत्तर देणे गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List