अडीचची डेडलाईन असताना ‘नीलकमल’ सवातीनला सुटलीच कशी? वाढीव प्रवासी कोंबण्यासाठी प्रवाशांच्या जीवाशी खेळ
नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने बुधवारी ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीला जलसमाधी मिळाली. असे असले तरी या दुर्घटनेला बंदर अधिकारी आणि बोटमालकांचे साटेलोटेच जबाबदार असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. घारापुरी लेण्यांवर जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून शेवटची बोट साधारण अडीच वाजता सुटते. मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जास्त प्रवासी कोंबण्यासाठी ‘नीलकमल’च्या मालकाने वेळेची डेडलाईन चुकवत सवातीन वाजता बोट सोडली. अडीचची डेडलाईन असताना बोट उशिरा सुटलीच कशी, असा संतप्त सवाल करण्यात येत आहे. जर ही बोट वेळेत निघाली असती तर कदाचित ही भयंकर दुर्घटना टळली असती. त्यामुळे 13 जणांचे गेलेले बळी हे बोट मालक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचेच पाप असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरी बेटाकडे निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला दुपारी 3.55 वाजता नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. यात 13 जणांचा बळी गेला आहे.
दुर्घटनेला बोटमालक आणि बंदर अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. घारापुरी लेण्यांचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी सायंकाळी 5 वाजता बंद करण्यात येतात. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया येथून शेवटची लाँच अडीच ते पावणेतीन वाजता सुटते, परंतु अनेकदा जादा पैशांच्या हव्यासापोटी लाँच मालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीत कोंबतात.
हा जीवघेणा प्रवास खुलेआम सुरू असताना त्याकडे बंदर अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. आर्थिक साटेलोट्यातूनच प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ खेळला जातो. नीलकमल ही बोटदेखील वेळेचे गणित चुकवून सवातीन वाजता सोडण्यात आली.
बोटीने ठरलेल्या वेळेनुसार गेट वे ऑफ इंडिया सोडले असते तर नौदलाच्या स्पीड बोटीची झालेली टक्कर टळली असती. त्यामुळे या प्रकरणात बंदर अधिकाऱ्यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात यावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
सलग अकरा तास चालले पोस्टमार्टम
नीलकमल बोट दुर्घटनेतील मृतांना उरण येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मृतदेहांचा अक्षरशः खच या ठिकाणी पडला होता. अंगावर काटा आणणारे हे दृश्य पाहून शवविच्छेदनासाठी आलेले डॉक्टरही गहिवरून गेले. वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल आणि त्यांचे सहकारी डॉ. प्रकाश हिमगिरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून रात्री 1 वाजता अकरा मृतदेहांच्या शवविच्छेदनाला सुरुवात केली. हे काम गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत म्हणजेच सलग अकरा तास सुरू होते. त्यानंतर हे सर्व मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
नातेवाईकांच्या हंबरड्याने परिसर हादरला
नीलकमल दुर्घटनेत कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाची पत्नी तर काही जणांचे आई-वडील मृत्युमुखी पडले. मृतदेहांना ताब्यात घेण्यासाठी उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्याने परिसर हादरून गेला. घटनेत मृत्युमुखी झालेले पर्यटक हे नाशिक, नेव्हल करंजा, धुळे, बदलापूर, ठाणे, बिहार, उत्तर प्रदेश, नवी मुंबई, गोवा तसेच आंध्र प्रदेशातील रहिवासी होते अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक काळेल यांनी दिली.
दोन विदेशी पर्यटक ठरले देवदूत
अपघातग्रस्त बोटीमध्ये साऊथ आफ्रिकेचा अॅलेक्सझाड्रीला गॅब्रीला आणि जर्मनीची हॅनरीक गोवोलिक हे दोन पर्यटकदेखील होते. ते दोघेही पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे दुर्घटनेनंतर मृत्यू समोर दिसत असतानादेखील त्यांनी आपले स्वतः चे लाइफ जॅकेट बुडणाऱ्या अन्य प्रवाशांना देऊन त्यांचा जीव वाचवला. इतकेच नाही तर त्यांनी गोवोलिक व गॅब्रीला यांनी अन्य 19 पर्यटकांचेदेखील प्राण वाचवल्याची माहिती न्हावाशेवा बंदर पोलिसांनी दिली.
नवी मुंबई सागरी पोलिसांना बोटच मिळाली नाही
नीलकमल दुर्घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी दुर्घटनास्थळी जाण्यासाठी तयारी केली. मात्र नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेकडे गस्तीसाठी बोटी कमी असल्याने याचा फटका पोलिसांना बसला. त्यांना घटनास्थळावर पोहोचण्यासाठी एकही बोट उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे सागरी पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. दरम्यान असे काहीच घडले नसल्याचा दावा सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी केला.
डेकवर बसण्यासाठी प्रवाशांची लूट
पैशांच्या हव्यासापोटी सर्वच लाँचमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात. त्यातच डेकवर बसण्यासाठी कर्मचारी तिकिटाव्यतिरिक्त प्रवाशांकडून 50 ते 100 रुपये उकळतात. ही लूट खुलेआम केली जाते. मात्र यामुळे डेकवर गर्दी होऊन अपघाताचा धोका वाढतो. नीलकमल बोटीच्या डेकवरदेखील मोठ्या प्रमाणात पर्यटक असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे पगार जादा द्यावा लागतो म्हणून अनेक बोटमालक सारंग आणि ड्रायव्हरचे काम खलाशांकडूनच करून घेत असल्याचा आरोप होत आहे.
मुरुडमध्ये शिडांच्या बोटीतून असुरक्षित प्रवास
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि बोटमालकांच्या हलगर्जीपणामुळे मुरुडच्या समुद्रातही ‘नीलकमल’ दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी जेट्टीवरून शिडाच्या बोटीतून पर्यटकांना नेले जाते. मात्र 30 प्रवाशांची क्षमता असताना तब्बल 50 पर्यटकांची कोंबाकोंबी केली जात आहे. धक्कादायक म्हणजे पुरेसे लाईफ जॅकेटही नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत अनेकदा पर्यटकांनी आवाज उठवूनही कानाडोळा केला जात असल्याने मुरुडच्या समुद्रात शिडाच्या बोटीतून असुरक्षित प्रवास सुरूच आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मुरुडला येत असतात. हा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथील जेट्टीवरून शिडाच्या बोटीतून प्रवास करावा लागतो. या बोटींची क्षमता 30 ते 35 प्रवाशांची असताना 50 पेक्षा अधिक पर्यटक त्यामध्ये भरले जातात. या प्रकाराला एखाद्या पर्यटकाने विरोध केल्यास त्याला अरेरावी केली जाते. विशेष म्हणजे कोणत्याच शिडाच्या बोटीत पुरेसे लाईफ जॅकेट नसतात. त्यामुळे एखादी बोट कलंडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List