मिंधे गट स्वतंत्र नाही, त्यांचा पूर्णपणे ब्रेनवॉश झालाय! संजय राऊत यांचा घणाघात
नागपूर अधिवेशना दरम्यान महायुतीच्या आमदारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बौद्धिकाचं आयोजन केलं आहे. यासाठी मिंधे गटाचे आमदार तिथे दाखल झाले आहेत. यासंदर्भात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका परखड आणि स्पष्ट शब्दात मांडली. प्रखर राष्ट्रवाद हाच आमचा हिंदुत्त्ववाद राहिला असल्याचं सांगत त्यांनी मिंधे गटावर सडकून टीका केली. ‘आताचे स्वत:ला शिवसेना म्हणवणारे, भजन कीर्तन करत नागपूरच्या विधानसभेतून रेशीम बागेत जात असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र राहिलेला नाहीत तुमच्यावर नियंत्रण आहे. तुमच्यासाठी त्यांचं बौद्धिक घेण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे, याचा अर्थ तुमचा पूर्णपणे ब्रेनवॉश झालेला आहे’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा प्रखर हिंदुत्त्ववाद आणि शिवसेनेची स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली. पत्रकारांशी बोलताना, ‘एकनाथ शिंदे काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असं मत नव्हतं. शिवसेना ही एक स्वतंत्र संघटना त्यांनी निर्माण केली. महाराष्ट्राच्या न्यायहक्कासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी त्यानंतर हिंदूंवर होणाऱ्या अन्यायासाठी शिवसेना निर्माण केली’, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. भारतीय जनता पक्ष आणि संघ यांचा संबंध असू शकेल पण हिंदुहृदयसम्राटांनी सुरू केलेल्या शिवसेनेचा संबंध कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला नाही, बाळासाहेबांनी येऊ दिला नाही. बाळासाहेबांना दसऱ्याच्या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, पण शिवसेनाप्रमुख कधीही त्यावाटेनं गेले नाहीत. बाळासाहेबांचं हिंदुत्त्व हे एक वेगळ्या पद्धतीचं हिंदुत्त्व होतं. हिंदुत्त्व हेच आमचं राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रीयत्व हेचं आमचं हिंदुत्व ही भूमिका माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदुत्त्वाच्या विचारासाठी दुसऱ्या एखाद्या संघटनेचं मांडलिक व्हावं आणि त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडून बौद्धिकं घ्यावं एवढी कंगाल शिवसेना बाळासाहेबांनी केली नव्हती, असं खणखणीतपणे सांगतानाच मिंधे गटाची लाचारी सुरू असल्याचं ते म्हणाले.
‘बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे तो उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. त्यामुळे मी आमच्या शिवसेनेविषयी बोलत नाही. पण सत्तेत राहण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी ईडी, सीबीआयची जी भिती आहे त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी हे आज सगळे लोकं तिथे शेकोटीला गेले आहेत. बौद्धिकं कसली घेताय? बाळासाहेबांनी आम्हाला फार मोठी बुद्धी, ज्ञान आणि मार्गदर्शन केलं आहे. आरएसएसची उपशाखा कोणती असेल तरी भाजप आहे, फार तर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद असेल, पण शिवसेना एक स्वतंत्र राजकीय पक्ष आणि संघटना आहे. तुम्ही आमची घटना पाहू शकता. आमचा कारभार स्वतंत्र आहे’, असं त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितलं.
‘नक्कीच काही सरसंघचालकांसोबत शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत मधूर संबंध होते’, असंही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी टीका केली नाही, त्यांचं स्वतंत्र काम आहे!
संघाच्या कार्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मी कधीही टीका करणार नाही. आम्ही त्यापद्धतीनं कधीही टीका केली नाही. पण ते स्वतंत्र आहेत. त्यांचं काम स्वतंत्र आहे, त्यांची संघटना स्वतंत्र आहे. मोदी शहांपासून सगळे संघाचे सदस्य आहेत. शिवसेना त्यांची सदस्य नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करून. त्यांनी त्यांची संघटना वाढवली, आम्ही आमचा पक्ष आणि संघटना वाढवली आहे. प्रखर राष्ट्रवाद हाच आमचा हिंदुत्त्ववाद राहिला. पण आज जर स्वत:ला शिवसेना म्हणवणारे, भजन कीर्तन करत नागपूरच्या विधानसभेतून रेशीम बागेत जात असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र राहिलेला नाहीत तुमच्यावर नियंत्रण आहे. तुमच्यासाठी बौद्धिक घेण्याचा संघाचा कार्यक्रम आहे, याचा अर्थ तुमचा पूर्णपणे ब्रेनवॉश झालेला आहे. आम्ही असे नाही.’
आणीबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेची दिली आठवण
‘हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना ही आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून आणीबाणीमध्ये कठोर वातावरणात शिवसेनेनं काँग्रेसमध्ये विलिन व्हा असा दबाव होता पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तो दबाव झुगारून लावला आणि म्हटलं नाही माझी शिवसेना स्वतंत्र आहे, मी निर्णय घेईन. मी कुणाचं मांडलिकत्व पत्करणार नाही. मला तुरुंगात टाकलं तरी हरकत नाही. ही बाळासाहेबांची 1975 सालची भूमिका होती. त्यामुळे हे जे सांगताहेत की संघाची आणि शिवसेनेची विचारधारा एक आहे, तसे नाही. हिंदुत्त्व हा धागा एक आहे पण विचारधारा एक नाही’, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List