मुंबई बोट दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांनी गमावला जीव, नावं समोर, जखमींचा आकडा किती?
Mumbai boat tragedy : मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ बुडाली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या बोट दुर्घटनेतून आतापर्यंत 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. ‘गेट वे ऑफ इंडिया’कडून जाणाऱ्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिली. यामुळे ही दुर्घटना घडली, असं बोललं जात आहे. या दुर्घटनेत 98 जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींमध्ये सात पुरुष, चार महिला व दोन बालकांचा समावेश आहे.
अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. यानंतर बोटीवरील १०१ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नौदल, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केल्याने मोठी दुर्घटना टळली. आता या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, त्यांची नावे काय, कोणत्या रुग्णालयात किती लोकांवर उपचार याची माहिती समोर आली आहे.
मृत व्यक्तींची नावे
१) महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही)
२) प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार)
३) मंगेश(NAD बोट वरील कामगार)
४) मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट)
५) राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट)
६) साफियाना पठाण मयत महिला
७) माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन
८) अक्षता राकेश अहिरे
९) अनोळखी मयत महिला
१०) अनोळखी मयत महिला
११) मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे
१२) दिपक व्ही.
१३) अनोळखी पुरुष
जखमींचा आकडा किती?
मुंबईतील या बोट दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात जेएनपीटी रुग्णालयात एकूण ५७ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील ५३ प्रवाशांची प्रकृती स्थिर असून ३ जण गंभीर आहेत. तर एकाच मृत्यू झाला आहे. तसेच नेव्हीच्या डॉकयार्ड रुग्णालयात २५ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील २३ जणांची प्रकृती स्थिर असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच अश्विनी रुग्णालयात १, सेंट जॉर्ज रुग्णालयात ९, कारंजे रुग्णालयात १२ जणांना दाखल करण्यात आले होते. यातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. तर सेंट जॉर्ज आणि कारंजे रुग्णालयातील एकूण २१ जणांची प्रकृती स्थिर आहे. यासोबतच मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने या दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
नीलकमल बोटीत साधारण १२० प्रवाशी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. यात ११४ जणांचा आतापर्यंत शोध लागला आहे. त्यातील ९७ जणांची प्रकृती स्थिर आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List