अजित पवार यांनीच मंत्रिमंडळातून वगळले! छगन भुजबळ यांचा थेट हल्ला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आपल्याला मंत्रिमंडळातून वगळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचेसुद्धा त्यांनी ऐकले नाही. दुसऱया कोणाला दोष देण्यात अर्थ नाही, असा थेट हल्ला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर चढवला. ओबीसींचा एल्गार पुन्हा पुकारणार, सभागृहासह रस्त्यावरही लढाई घेऊन जाऊ, असा निर्धार त्यांनी केला. योग्य वेळी विचारपूर्वक निर्णय घेईन, तेव्हा भक्कम साथ द्या, असे आवाहन त्यांनी ओबीसी बांधवांना केले.
हम एक है, तो सेफ है
आपण मराठाविरोधी नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण, आमच्यावर कुरघोडी करणाऱयांना, आम्हाला संपवायला निघालेल्यांना, समतेचे चक्र उलटे फिरवू पाहणाऱ्यांना आम्ही विरोध करणारच, असे ते म्हणाले. ओबीसी समाजाचे निवडून येणारे आमदार आरक्षणाबाबत एक शब्द बोलत नाहीत, आपण बोललो तर पुन्हा निवडून येणार नाही, अशी भीती त्यांना वाटते. समाजासाठी लढणारी माणसं हवीत. जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठवाडय़ात भीती निर्माण झाली होती. मंत्रिपदाचा राजीनामा देवून मी 17 नोव्हेंबर 2023 ला अंबडला मेळावा घेतला, तेव्हा ओबीसी समाजाला दिलासा, आधार मिळाला, असे सांगत त्यांनी ‘हम एक है, तो सेफ है’ असा नाराच दिला.
भाजपात जाण्याचा सूर
भाजपाने ओबीसींना पाठिंबा दिला आहे. सत्तेशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, सत्तेत जावंच लागेल, भाजपात जा, असा सूर शिवाजी नलावडे, नवनाथ वाघमारे, बाळासाहेब कर्डक, राजेंद्र महाडोळे, पार्वतीबाई शिरसाट यांनी आळवला.
इतरांचा दोष नाही
मला जर आता राज्यसभेवर पाठवायचं होतं, तर येवल्यातून उभं करायचंच नव्हतं. माझा मंत्रिमंडळात समावेश असावा, असा आग्रह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांचाच होता. अजित पवार यांनी कोणाचेही ऐकले नाही, मला मंत्रिमंडळातून वगळले. इतर कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेता ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ अशी अवस्था माझी केली.
ताकद दाखवावी लागेल
ओबीसींचा एल्गार पुन्हा पुकारणार आहे. महाराष्ट्रात गावागावातून ही लढाई रस्त्यावर घेऊन जाऊ. इतर राज्यांतून फोन येत आहेत, तेथेही मी जाईन. आता जावं लागेल, ताकद दाखवावी लागेल, असे भुजबळ म्हणाले. काही वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदान, पाटण्यातील गांधी मैदानासह गुजरात, गोवा, राजस्थानात समता परिषदेच्या सभा झाल्या. आता पुन्हा देशभर जावं लागेल, असे ते म्हणाले.
घाईघाईत उडय़ा मारण्यात अर्थ नाही
एकटय़ा ‘लाडकी बहिणी’मुळे महायुतीला बहुमत मिळाल्याचा काहींचा भ्रम आहे. छगन भुजबळ यांचं आता काही नाही, असं त्यांना वाटत असेल. पण, या यशात ओबीसींचा वाटा आहे. बहुमताने सरकार येवूनही अशी अवहेलना का, याचं शल्य आहे. मंत्री नसलो तरी मी सभागृहात लढणार आहे, रस्त्यावरही लढेल. उद्या-परवा मुंबईत जाईल, तेथे ओबीसी नेत्यांशी चर्चा करीन, पुन्हा येथे चर्चा करीन. घाईघाईत प्रश्न सुटत नाही. घाईघाईने कुठेही उडय़ा मारण्यात अर्थ नाही. विचारपूर्वक निर्णय घेईल, तेव्हा सर्वांनी साथ द्या.
‘शेरोशायरी’तून दिले आव्हान
ग कभी डर ना लगा मुझे फांसला देखकर,
मैं बढता गया रास्ता देखकर ।
खुद ही खुद नजदीक आती गयी मंझिल, मेरा बुलंद हौसला देखकर ।
ग मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब,
एक ऐसा दौर आयेगा,
मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी
ग मैं मौसम नहीं हूँ पल में बदल जाऊं,
मैं इस जमीन से दूर कहीं औरही निकल जाऊं,
मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ, मुझे फेंक ना देना,
हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए
संरक्षणाची ढाल कोण उभी करणार?
मंत्रिपदं कितीवेळा आली, गेली. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केले. आता समाजाच्या प्रश्नांसाठी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार, हा प्रश्न आहे. निखाऱयावरील राख हटवून हा लढा पेटविण्यासाठी संयमाने सर्वत्र निदर्शने करा. कुठल्याही दबावाला बळी न पडता शेवटचा श्वास असेपर्यंत मागासवर्गीयांसाठी लढणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. कदाचित आपल्यावर वरवंटा चालविला तरी रस्त्यावर लढायला तयार आहोत, असा दोन्ही हात वर करून त्यांनी उपस्थितांकडून भक्कम साथीचा होकार मिळवला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List