‘या’ मराठमोळ्या मॉडल अन् अभिनेत्याच्या न्यूड पोजने उडवली होती खळबळ; तब्बल 14 वर्षांचा खटला
सध्या बॉलिवूडमध्ये बोल्ड फोटोशूट करणं हे अतिशय सामान्य बाब झाली आहे. मग ते अभिनेता असो किंवा अभिनेत्री. मॅगझीन कव्हरपेजसाठी शूट असो किंवा मॉडेलिंग असो अशा प्रकारचे फोटोशूट म्हणजे एक ट्रेंड झालेला आहे. त्याबद्दल कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फार तर फार नेटकरी कमेंट करतात किंवा ट्रोल करतात.
याव्यतिरिक्त वेगळं असं काही घडत नाही. पण एका मॉडेल तथा अभिनेत्याच्या बाबतीत वेगळचं घडलं होतं. याने केलेल्या एका फोटोशूटमुळे एवढी खळबळ उडाली होती की त्याच्याविषयी तक्रार दाखल करण्यात आली होती.
90 च्या दशकातील जाहिरातीने सर्वांचीच झोप उडवली होती
ही गोष्ट आहे 90 च्या दशकातील. 2 मराठमोळी मॉडेल असलेल्या मुलीने आणि मुलाने न्यूड फोटोशूट केलं आणि संपूर्ण देशात खळबळ माजली. 90 चे दशक हे बदलाचं होत. चित्रपट टेलिव्हिजन, म्युजिक, जाहिराती, मीडिया अशा सर्व क्षेत्रामध्ये नवनवीन आणि बोल्ड असे प्रयोग अगदी बिनधास्त पणे केले जात होते.
आजच्या सोशल मीडिया आणि OTT च्या काळात न्यूडीटी हाविषय जरी नॉर्मलाईज झाला असला तरी 90 च्या काळात बोल्ड कपडे घालणं हा देखील वादाचा विषय ठरायचा.
मात्र या बोल्डनेस , बोल्ड मॉडेलिंगची संस्कृती रुजू व्हायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा टीव्ही चॅनेल्स आणि प्रिंट मिडियामध्ये जाहिरातींचा वेगही वाढला होता. त्यामुळे मॉडेल्सना जाहिरातींमध्ये काम मिळत होतं आणि त्यातूनच फेमही. यादरम्यान अशीच एक जाहिरात वादग्रस्त ठरली ती म्हणजे मराठमोळे मॉडेल मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांची एक प्रिंट जाहिरात. मॉडेल मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांची न्यूड जाहिरात होती
काय होती जाहिरात?
मधू सप्रे हिने 1992 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. तर मिलिंद सोमणने तोपर्यंत भारतीय मॉडेलिंग क्षेत्रात बरचं नाव कमावलं होतं.त्याने त्याच वर्षी अलिशा चिनाईच्या मेड इन इंडिया या लोकप्रिय म्युझिक अल्बमद्वारे लोकप्रियता मिळवली होती. 1995 मध्ये ‘टफ्स शूज’ हा इंटरनॅशनल ब्रँड भारतात पाय रोवू पाहत होता.
मात्र इतर भारतीयांसाठी हा तुलनेने अज्ञात ब्रँड होता. त्यामुळे त्यांनी भारतीय मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्याच्या हेतून ही जाहिरात शूट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मिलिंद आणि मधू सप्रे यांची निवड करण्यात आली. या काळात मधु आणि मिलिंद एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या रंगल्या होत्या. त्यामुळे दोघांनी ही जाहिरात सहज केली असावी असेही लोकांचे मत होतं.
जाहिरातीच्या फोटोमध्ये दोघेही होते न्यूड
छायाचित्रकार प्रबुद्ध दासगुप्ता यांनी काशीद येथील तिच्या घरी शूट केली होती. मात्र ज्यादिवशी ही जाहिरात काही मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाली संपूर्ण देशात खळबळ माजली. कारण या जाहिरातीत दोघांनीही ‘न्यूड’ पोज दिली होती. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. फक्त पायात शूज घातले होते आणि ते एकमेकांना चिकटून उभे होते. ही जाहिरात अधिक मसालेदार करण्यासाठी, त्यांच्या अंगावर गुंडाळलेला अजगरदेखील ठेवण्यात आला होता. ती जाहिरात अश्लील असल्याच्या आरोप अनेक संघटना आणि राजकीय पक्षांकडून झाले.
अनेक संस्थांनी घेतला आक्षेप
शिवसेनेकडून त्यावेळी निषेधाच्या घोषणा झाल्या. तर मुंबई ग्राहक पंचायत आणि स्वयंसेवी ग्राहक संघटना यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून, जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती.
दोन्ही मॉडेल्सवर महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायदा, 1986 चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. शिवाय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत, मोहिमेमागील एजन्सी ॲम्बियन्स ॲडव्हर्टायझिंग विरुद्ध प्राणी हक्क गटाने एक खटला दाखल केला. त्यांच्यावर अजगराचा बेकायदेशीरपणे वापर केल्याचा आणि प्राण्यांवर क्रूर वर्तन केल्याचा आरोप होता. असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण 14 वर्षे न्यायालयात सुरु होतं.
14 वर्षे कोर्टात चालला खटला
14 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर 2009 मध्ये खटला निकाली काढण्यात आला आणि सोमण व सप्रे यांच्यासह इतर सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पीठासीन न्यायाधीश एमजे मिर्झा यांनी आपल्या निकालात असे निरीक्षण नोंदवले की, “समाजाच्या एका गटासाठी जे अश्लील असू शकते ते दुसऱ्या गटासाठी अश्लील असू शकत नाही.”
तथापि, या वादाचा फायदा कंपनीला झाला. या वादामुळे अधिकाधिक ग्राहक या शूजकडे आकर्षित झाले. या जाहिरातीने अनेक पुरस्कार जिंकले आणि सुरुवातीला टफ्स शूजची विक्री प्रचंड प्रमाणात होऊ लागली. या जाहिरातीची चर्चा आजही सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List