‘यापुढे असं होणार नाही..’; सोनाक्षी सिन्हाच्या प्रत्युत्तरानंतर मुकेश खन्ना यांची माघार
2019 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला रामायणाशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. या घटनेला आता पाच वर्षे उलटल्यानंतर त्यावरून एक वेगळं ‘रामायण’ सुरू झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. यामागचं कारण म्हणजे ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांनी वारंवार विविध मुलाखतींमध्ये केलेला सोनाक्षीचा अपमान. इतकंच काय तर त्यांनी तिच्या संगोपनावरही प्रश्न उपस्थित केला. अखेर संयमाचा बांध सुटलेल्या सोनाक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहित मुकेश खन्ना यांना सुनावलं. ‘पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी माझ्यात जी मूल्ये रुजवली आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलायचं ठरवाल तेव्हा कृपया लक्षात ठेवा की त्या मूल्यांमुळेच मी आज अत्यंत आदराने हे सगळं बोलतेय,’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीसाठी पोस्ट लिहिली आहे. त्याचप्रमाणे यापुढे तिचा किस्सा ते कोणत्याही मुलाखतीत पुन्हा सांगणार नाहीत, याचं आश्वासन त्यांनी दिलंय.
मुकेश खन्ना यांची पोस्ट-
‘प्रिय सोनाक्षी, तू प्रतिक्रिया घेण्यासाठी इतका वेळ घेतलास हे पाहून मला आश्चर्य वाटतंय. प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती या शोमधील उदाहरण सांगताना मी तुझं नाव घेऊन तुझ्याविरोधी वक्तव्य करत होतो, हे मला माहीत आहे. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की त्यामागे तुझी किंवा तुझ्या वडिलांची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताच वाईट हेतू नव्हता. तुझे वडील माझे सीनिअर आहेत आणि त्यांच्यासोबत माझं खूप चांगलं नातं आहे. माझा एकच उद्देश होता की आजच्या पिढीबद्दल ज्यांना ‘जेन-झी’ (Gen-Z) असं म्हटलं जातं, जे आजच्या गुगल विश्वाचे आणि मोबाइल फोन्सचे गुलाम झाले आहेत, त्यांच्याबद्दल मला कमेंट करायचं होतं. त्यांचं ज्ञान विकिपिडियापर्यंत आणि त्यांचा सामाजिक संवाद फक्त युट्यूबपुरता मर्यादित राहिला आहे. इथे माझ्यासमोर तुझी हायफाय केस असताना मी विचार केला की त्याचा वापर करून दुसऱ्यां मुलांना, वडिलांना, मुलींना शिकवू शकेन’, असं त्यांनी लिहिलंय.
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात जपून ठेवलेलं खूप मोठं आणि अफाट ज्ञान आहे जे आजच्या प्रत्येक तरुणाने जाणून घेतलं पाहिजे. त्याबद्दल फक्त जाणूनच घेतलं नाही पाहिजे तर त्याचा अभिमानदेखील वाटला पाहिजे. हाच माझा हेतू होता. होय, मला या गोष्टीची खंत आहे की मी माझ्या एकापेक्षा अधिक मुलाखतींमध्ये मी तुझं नाव घेऊन त्याचा उल्लेख केला. ही गोष्ट मी लक्षात ठेवीन. यापुढे असं होणार नाही, याची मी खात्री देतो. काळजी घे.’
काय म्हणाली होती सोनाक्षी?
मुकेश खन्ना यांच्याकडून वारंवार होणाऱ्या उल्लेखाला वैतागून अखेर सोनाक्षीने लिहिलं, ‘मी नुकतंच तुम्ही केलेलं वक्तव्य वाचलं की रामायणाबद्दलच्या प्रश्नाचं मी योग्यरित्या उत्तर न देणं ही माझ्या वडिलांची चूक आहे. खूप वर्षांपूर्वी मी त्या शोमध्ये गेली होती. सर्वांत प्रथम मी तुम्हाला आठवण करून देते की त्यादिवशी हॉटसीटवर दोन महिला होत्या, ज्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. परंतु तुम्ही फक्त माझंच नाव वारंवार घेत आहात, ज्यामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे. होय, त्यादिवशी मी कदाचित विसरले होते की संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती. विसरणं ही एक मानवी प्रवृत्ती आहे. पण हेसुद्धा तितकंच स्पष्ट आहे की तुम्हीसुद्धा भगवान राम यांनी शिकवलेलं क्षमा आणि क्षमाशीलताचे धडे विसरला आहात. जर प्रभू राम मंथरा यांना माफ करू शकतात, जर ते कैकेयीला माफ करू शकतात, महायुद्ध झाल्यावर रावणालाही माफ करू शकतात, तर त्या तुलनेच ही अत्यंत छोटी गोष्ट तुम्ही नक्कीच माफ करू शकता. मला तुमच्या माफीची गरज नाही. पण चर्चेत राहण्यासाठी तुम्ही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या नावाखाली तीच घटना वारंवार समोर आणणं थांबवावं आणि विसरून जावं याची नक्कीच गरज आहे. शेवटचं म्हणजे पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी माझ्यात जी मूल्ये रुजवली आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलायचं ठरवाल तेव्हा कृपया लक्षात ठेवा की त्या मूल्यांमुळेच मी आज अत्यंत आदराने हे सगळं बोलतेय. तेसुद्धा तुम्ही माझ्या संगोपनावर प्रश्न उपस्थित केल्यानंतरही मी आदरपूर्वक हे स्पष्ट करतेय.’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List