Dharashiv : राज्याचा बिहार होतोय का? पवनचक्कीसाठी जमीन बळकवण्याचा प्रयत्न, शेतकर्याला बेदम मारहाण, पोलीसांचे गुंडांना अभय?
राज्याचा बिहार होतोय का? असा सवाल विरोधक सरकारला विचारत आहेत. मराठवाड्यात या महिन्यात घडलेल्या गोष्टीत पोलीसच गुन्हेगारांना साथ तर देत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परभणी, बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्यात गुंडांची दहशत समोर येत आहे. या तीनही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा रोकडा सवाल विरोधकांनी विचारला आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मारहाण करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे पोलीसांकडे धाव घेतल्यावर पण ते बघ्याची भूमिका वठवत असल्याने त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण?
जे एस डब्ल्यू या पवनचक्की कंपनीला तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील ठोंबरे कुटुंबियांनी 20 गुंठे जमीन भाडे तत्त्वावर दिली आहे. मात्र या कंपनीकडून शेतकर्यांना दमदाटी करण्यात आली आहे. ठोंबरे यांची 22 गुंठे जमीन न घेता 35 गुंठे जमीन बळकवण्यात आली, असा आरोप ठोंबरे कुटुंबियांनी केला आहे. करारापेक्षा जास्त जमीन देण्यास शेतकऱ्याने विरोध केल्यावर जे एस डब्ल्यू या कंपनीच्या ठेकेदाराने भाडोत्री गुंडाकडून जमीन मालक सचिन ठोंबरे यांना बेदम मारहाण केली.
या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी सचिन ठोंबरे याच्या डोक्यात लोखंडी रॉड लागला. या मारहाणीत तो रक्त बंबाळ झाला. पण पोलिसांनी त्याची साधी तक्रार सुद्धा घेतली नसल्याचा आरोप सचिन ठोंबरे यांनी केला आहे.
कारवाई सोडा पोलीसच मूग गिळून
शेतकरी सचिन ठोंबरे याला मारहाण केल्यानंतर त्याच्या आई-वडीलांना पवनचक्कीच्या गुंडांनी धक्का बुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या शेतकर्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. सचिन ठोंबरे यांनी थेट धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली. मात्र गेली 21 तारखेपासून आजपर्यंत या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचे शेतकर्याकडून दावा करण्यात येत आहे.
हा घडलेला प्रकार दाबण्यासाठी पवनचक्कीच्या गुप्तेदाराकडून शेतकरी सचिन ठोंबरे याला वीस गुंठ्यापेक्षा अधिक जमिनीचा मोबदला म्हणून 75 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. पण त्यात पैसेच नव्हते. अशी फसवणूक सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच धाराशिवमधील बारुळ गावातील ठोंबरे कुटुंबिय पवनचक्कीच्या गुंडांच्या दहशतीखाली वावरत असल्याच समोर आले आहे. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामधील पवनचक्कीच्या गुंडांची दहशत कधी संपणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकर्यांना पडला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List