शिंदेना फोडणारी अदृश्य महाशक्ती भुजबळांना उत्तेजन देत होती, त्यातच त्यांचा बळी गेला – संजय राऊत
अजित पवार गटाचे नेते, आमदार छगन भुजबळ यांच्या नाराजीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला फटकारले आहे. ”आमचा पक्ष फोडताना जी अदृश्य महाशक्ती एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी होती त्याच महाशक्तीने भुजबळांना मनोज जरांगेविरोधात उत्तेजन दिलं. त्यातच त्यांचा बळी गेला’, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली होती. आमचं त्यांना म्हणनं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता. कारण दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख समाज आहेत. मात्र भुजबळांना टोकाची भूमिका घ्यायला लावली. मनोज जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी छगन भुजबळांचा टोकाचा वापर झाला. ज्यांनी त्यांना ही भूमिका घ्यायला आता त्यांनी आता त्यांना वाऱ्यावर सोडलंय. एक अदृश्य महाशक्ती जी शिंदेना आमचा पक्ष फोडण्यासाठी पाठिंबा देत होती तिच अदृश्य शक्ती भुजबळांना उत्तेजन देत होती. यात भुजबळांचा बळी गेला आहे. आता भुजबळांनी किती आदळआपट केली तरी त्यांची लढण्याची शारीरिक व मानसिक ताकद राहिली ते बघावं लागेल. महाराष्ट्रात जातीय सलोखा रहावा ही आमची भूमिका आहे. बाकी इतर नाराज लोकं अश्रू ढाळतायत त्यांच्या अश्रूंना कोण विचारतंय. पुरंदरचे आमदार, बोरिवलीचे आमदार, आमचे सुधीर भाऊ यांच्या अश्रूंना काय किंमत आहे. एखाद दुसरा आमदार नाराज झाला तर या सरकारला काही फरक पडणार नाही. एखाद दिवस ते रडतील नंतर त्यांच्या हातात एखादं खुळखुळं दिला जाईल”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List