कांद्याचे दरही घसरले, लागवडीसाठी रोपेही मिळेनात; शेतकरी दुहेरी संकटात
नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात होता. चांगला जुना कांदा 700 रुपयांपर्यंत विकला जात होता. मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा काढण्यास सुरूवात केली. यामुळे कांद्याचे भाव गडगडले. तर दुसरीकडे कांदा लागवडीसाठी शेतकऱ्याला रोपे मिळत नाहीत. रोपे मिळाली त्यांना लागवड करण्यासाठी मजुर मिळत नाहीत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
मागील महिन्यात दहा किलोला 600 ते 700 रुपये पार केलेला कांदा या महिन्यात 300 ते 350 रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वत्र कांदा लागवडी सुरू आहे. मात्र लागवडीसाठी शेतकऱ्यांना कांदा रोपेच उपलब्ध होत नाहीत. ज्यांच्याकडे रोपे उपलब्ध झाली आहे त्यांना कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नाही, अशीही कांद्याची बिकट अवस्था झालेली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तानचा कांदा बाजारात येत होता. तरीही कांद्याचा 50 ते 55 रुपये एवढा भाव टिकून राहिला होता. मात्र मागील काही दिवसात ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीस मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. त्यामुळे बाजार भाव गडगडायला सुरुवात झाली.
मंचर बाजार समितीत काल रविवारी झालेल्या कांद्याच्या लिलावात सुमारे 24 हजार पिशव्या आल्या होत्या. त्यापैकी 214 पिशव्यांना 351 ते 400 रुपये दहा किलोस बाजार भाव मिळाला.
सुपर कांदे 300 ते 330 रुपये, सुपर मिडीयम कांदे 260 ते 320 रुपये, गोल्टी कांदा 100 ते 330 रुपये आणि बदला कांदा 50 ते 120 रुपये असा दहा किलोस बाजार भाव मिळाला. सोमवारी लोणी उप बाजार समितीत झालेल्या लिलावामध्ये सुपर कांद्यास 330 ते 351 रुपये, सुपर मिडीयम कांदे 230 ते 325 रुपये, गोल्टी कांदा 110 ते 220 रुपये, बदला व चिंगळी कांदा 50 ते 100 रुपये असा दहा किलो बाजार भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List