आता खरी मजा हिशेब चुकता करण्याची – जरांगे
आरक्षणासाठी मराठा समाजाला वाट पाहायला लावणाऱ्या महायुती सरकारला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी इशारा दिला. आता खरी मजा आहे हिशेब चुकता करण्याची. आधी ते दुसऱ्यांवर ढकलत होते पण आता कळेल की, आरक्षण देतात की नाही, अशा शब्दांत जरांगे-पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.
मी कधीच जातीवाद केलेला नाही. गरजवंत मराठा समाजातील लेकरं मला आरक्षणाच्या माध्यमातून अधिकारी झालेले पाहायचे आहेत. समाजावर कोणतंही संकट येऊ द्या, मी ते परतवून लावण्यासाठी सदैव तत्पर आहे. समाजाची साथ मी मरेपर्यंत विसरणार नाह़ी आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि तोपर्यंत स्वस्थही बसणार नाही. अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहणार आहे, अशी ग्वाही मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आज दिली.
पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी मी लढत आहे. म्हणून सरकारने वेगवेगळी षड्यंत्र रचून मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील माझ्या तमाम सकल मराठा बांधवांच्या एकजुटीमुळे त्यांचे हे षड्यंत्र हवेत विरले, असे ते म्हणाले.
पुढील महिन्यात येत्या 25 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथे मी पुन्हा बेमुदत उपोषणाला बसत आहे. तेथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. दरम्यान, मराठा आरक्षण हा विषय मजा घेण्याचा नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List