Jalna News – पाईपलाईन लिकेज काढण्यासाठी गेलेल्या शेतकरी भावंडांवर काळाचा घाला, एकाचा मृत्यू दुसरा गंभीर
पाईपलाईनचे लिकेज काढण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहाँगीर खल्याळ गव्हाण मार्गालगत जवळपास 12 फूट खोल नाली जेसीबीद्वारे खोदण्यात आली होती. त्या नालीत अचानक बाजूची दरड खचल्याने जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द या गावातीन दोन सख्खे भाऊ मलब्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत एका भावाचा मृत्यू झाला असून एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
या दुर्घटनेत दिलीप गजानन डोईफोडे (35) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा भाऊ बद्री गजानन डोईफोडे हे जखमी झाले आहेत. तर तिसरा संदीप हा लिकेज साहित्य आणण्यासाठी बाजूला गेल्यामुळे सुरक्षित राहिले आहेत. डोईफोडे हे तिघेही भावंड शेती सिंचनासाठी असलेल्या पाईपलाईनची गळती लागल्यामुळे ती गळती बंद करण्यासाठी गेले होते. गळतीमुळे लगतची जमीन ओली झालेली होती व 12 फूट नाली खोदल्यानंतर तेथे काम करीत असताना अचानक नालीच्या काठावरील मलबा खचला व त्यात दिलीप व गजानन हे दोघेही त्याखाली दबले गेले. त्यानंतर जेसीबीद्वारे हा मलबा हटविण्यात आला. दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.
डॉ. अक्षय गुटे आणि त्यांच्या सहकार्यांनी तपासणी करून दिलीप गजानन डोईफोडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने त्यांस मृत घोषित केले. त्यांचा जखमी भाऊ बद्री डोईफोडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. मयत दीपक डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, भावजय, असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी रात्री 10 वाजता डोलखेडा खुर्द येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर शिवारातील या दुर्घटनेप्रकरणी समाधान बाबुराव डोईफोडे रा. डोलखेडा खुर्द यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List