रघुपती राघव राजा राम… गांधीजींचं भजन म्हटल्याने भाजप नेते लोकगायिकेवर संतापले! मंचावरच माफी मागायला लावली
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पाटण्यामध्ये भाजपने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भोजपुरी गायिकेने महात्मा गांधीजींचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजा राम…’ म्हटले. यावेळी गायिकेने ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम…’ ही ओळ म्हणताच सभागृहात मोठा हंगामा झाला. हंगामा होत असताना माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेही तिथे उपस्थित होते.
बिहारची राजधानी पाटणामध्ये बापू सभागृहात बुधवारी अटल जयंती समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात महात्मा गांधीजींच्या आवडत्या भजनावरून मोठा वाद झाला. भोजपुरी गायिका देवी यांनी मंचावरून महात्मा गांधींच्या भजनातील ओळ ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम…’ म्हणताच मोठा हंगामा झाला. ईश्वर अल्लाह म्हटल्याने सभागृहात गायिकेला मोठा विरोध झाला. घोषणा देण्यात आल्या. यामुळे गायिकेला मंचावरून माफी मागावी लागली.
हंगामा वाढल्याचे पाहून भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी मंचावरून गायिकेला हटवले. भजन म्हणण्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. यामुळे आपण माफी मागितली, असे लोकगायिका देवी यांनी सांगितले. मंचावर त्यावेळी 20 हून अधिकजण उपस्थित होते. अखेर गायिका देवी यांनी सुप्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांना स्मरण करत ‘छठी मैया आई ना दुअरिया’ हे भक्तिगीत म्हटले आणि कार्यक्रमातून निघून गेल्या.
या घटनेवर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटणामध्ये गायिकेने गांधीजींचे भजन ‘रघुपती राघव राजा राम, पतीत पावन सीता राम’ म्हटल्याने नितीशकुमार यांचे मित्र भाजपवाल्यांनी मोठा हंगामा केला. भजनामुळे संकुचित वृत्तीच्या लोकांच्या भावना दुखावल्या, असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List