जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी बेकायदा उत्खनन, पाच महिन्यांपासून रात्रीतही खेळ चाले; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी गायमुखाजवळ गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे. विशेष म्हणजे मंदिराकडे जाणारे रस्ते आणि पश्चिमेकडील बाजूच्या यात्री निवासकडील डोंगराचा भाग खचला आहे. या परिसरात खाली बुद्धकालीन गुंफा आहेत. तर बिबटय़ांसह इतरही जैवविविधता असून, हा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही डोंगर पोखरण्याचा उद्योग नेमका कोणासाठी सुरू आहे, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. तसेच भविष्यात मंदिराला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
दरम्यान, शेजारी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम जोरदार सुरू आहे. त्याचाच एक भाग असल्याचे वाटावे, अशा पद्धतीने जोतिबा डोंगरावरील पायथ्याशी गायमुखाजवळ हे डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. विशेषतः रात्री मोठय़ा प्रमाणात उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी असून, याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही गेल्या पाच महिन्यांपासून हे उत्खनन बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसते. शिवाय याबाबत अहवाल देण्यास पन्हाळा प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्याच आठवडय़ात कळे परिसरातील उत्खननाची तक्रार झाली होती. तेव्हाही असे काही उत्खनन सुरूच नसल्याचे अधिकारी छातीठोकपणे सांगत होते. पण नंतर त्यांनीच त्याची चौकशी सुरू केल्याची आठवणही प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी यानिमित्ताने करून दिली. दरम्यान, ज्या पद्धतीने डोंगर परिसरातील सुरू असलेले हे बेकायदेशीर उत्खनन पाहता याला सर्व प्रशासकीय अधिकारी जबाबदार असून, यामुळे भविष्यात मंदिराला धोका निर्माण होणार आहे तसेच माळीण दुर्घटनेची येथील पुनरावृत्ती होईल, अशी भीतीही देसाई यांनी व्यक्त केली आहे.
भविष्यात मंदिराला धोका; ‘माळीण’ची पुनरावृत्ती होईल
या बेकायदेशीर उत्खननाबाबत आपल्या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतरही पन्हाळ्याचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांनी हे आदेश पाळलेले नाहीत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून हे बेकायदेशीर उत्खनन सुरूच आहे. आज रविवारीसुद्धा सुरू असलेले हे उत्खनन पाहता, प्रांताधिकारी आणि तहसीलदार आपले आदेश मानत नसून बेकायदेशीर बाबींना संगनमताने साहाय्य करीत आहेत आणि शासनाचे नुकसान व त्याचबरोबर ज्योतिबा डोंगर आणि मंदिर यांना धोका उत्पन्न होईल असे कृत्य जाणूनबुजून करीत असल्याची तक्रार दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List