पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून पत्नीचा केला खून; आरोपी ताब्यात
हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागातील सासरवाडीत येऊन पोलीस कर्मचाऱ्यांने पत्नीवर गोळी झाडून खून केल्याची घटना बुधवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये सासू, मेव्हणा व मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिराने ताब्यात घेतले.
वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विलास मुकाडे व त्याची पत्नी मयुरी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. सततच्या भांडणामुळे मयुरी ह्या दोन, तीन दिवसांपासून हिंगोली शहरातील प्रगतीनगर येथील माहेरी राहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान बुधवारी विलास व मयुरी यांच्यामध्ये मोबाईल वरून टोकाचा वाद झाला होता. दरम्यान, विलास हा वसमत येथून ड्युटी संपवून रात्री नऊ वाजता हिंगोली शहरातील प्रगती नगर येथील सासरवाडीत आला होता. त्याने सोबत आणलेल्या पिस्टलमधून पत्नी मयुरी मुकाडे हिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर सासू वंदना धनवे, मेव्हणा योगेश धनवे व अडीच वर्षाच्या मुलावर गोळीबार करून विलास हा फरार झाला होता. या घटनेने हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुनिशाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमध्ये मयुरीचा जागेवरच मृत्यू झाला होता तर सासू मेव्हणा व मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिघांची ही प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपी विलास मोकाडे याला तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक विकास पाटील, श्यामकुमार डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्या पथकाने रात्री उशिराने शहरात जवळील कारवाडी परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List