संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरण, अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
हैदराबादमधील संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करत शुक्रवारी (13 डिसेंबर) रोजी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला तेलंगणातील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीअंती अल्लू अर्जुनला कोठडी सुनावली.
‘पुष्पा 2’च्या प्रिमिअरसाठी 4 डिसेंबर रोजी अभिनेता अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वसूचना न देता हैदराबामधील संध्या थिएटरमध्ये गेला होता. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर एक मुलगा जखमी झाला.
चेंगराचेंगरी आणि महिलेच्या मृत्यू प्रकरणी संध्या थिएटरच्या व्यवस्थापनासह अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा टीमवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला घरातून ताब्यात घेत अटक केले. अल्लू अर्जुनविरोधात बीएनएस कलम 105, 118 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, अल्लू अर्जुनचा बॉडीगार्ड संतोषलाही पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत अल्लू अर्जुनसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List