क्षणिक की दीर्घकालीन लाभ? कोणत्या योजना अधिक महत्त्वाच्या लोकांनी ठरवावं; नितीन गडकरींचा सल्ला, सरकारलाही चिमटा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कायमच त्यांच्या निडर आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देखील विविध विषयावर त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी नितीन गडकरी यांनी मतदारांना निवडणुकीपूर्वी मोफत योजना देणाऱ्या राजकीय पक्षांबद्दल सावध केलं आणि त्यांना दीर्घकालीन फायद्या देणाऱ्या योजना पाहिजेत की तात्काळ-क्षणिक लाभ देणाऱ्या योजना याचा तौलनिक विचार लोकांनीच करायला पाहिजे, असं गडकरी यावेळी म्हणाले.
आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना, गडकरींनी निदर्शनास आणून दिलं की निवडणुकीवेळी अशा योजना एक शक्तिशाली साधन पुढे येत असल्या तरी धोकादायक आहे. ‘लोकांना तात्काळ-क्षणिक फायदा हवा आहे की दीर्घकालीन फायदा हवा आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. शॉर्टकट तुम्हाला कमकूवत करतात’, असं गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलं.
शाश्वत विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतील असं त्यांनी जोर देऊन सांगितलं. जनतेला ‘मनी ऑर्डर’ पाठवण्याऐवजी देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे आणि लोकांचे राहणीमान सुधारण्यावर लक्षं केंद्रित केलं पाहिजे’, असं म्हणत त्यांनी सरकारला देखील झोडलं.
‘समस्या ही आहे की जेव्हा एका पक्षानं हा प्रकार सुरू केला तेव्हा प्रत्येकजण तसं करू लागला’, असं गडकरी म्हणाले.
राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी गोष्टी मोफत देण्याचा धडाका लावला आहे ज्यामुळे लोकंही ज्या पक्षाकडून सर्वात जास्त ऑफर देतील अशांना मत देऊ लागले, असं गडकरींनी नमूद केलं.
ते म्हणाले की, ‘मलाही असं म्हणावंसं वाटतं की केजरीवाल यांनी 1,000 रुपये देऊ केले तर आम्ही 1,500 रुपये देऊ; जर त्यांनी 1,500 रुपये सांगितले तर आम्ही 2,000 देऊ. तुम्हाला कुणाकडून काय मिळत आहे ते घ्या. मात्र नंतर विचार करूनच मतदान करा’.
ते पुढे म्हणाले, ‘लोकांनी प्रथम त्यांचे विचार बदलणे आवश्यक आहे. जर राजकीय पक्षांना हे लक्षात आलं की अशा योजनांनी निवडणूका जिंकता येत नाहीत तर तेही त्याचे अनुसरण करतील’.
गडकरी म्हणाले की सर्व नागरिकांची सेवा करण्यास ते कटिबद्ध आहे. ‘जो मला मत देईल त्याच्यासाठी मी काम करेन आणि जो मला मत देत नाही त्याच्यासाठीही काम करेन’, असं त्यांनी सांगितलं.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘बटेंगे ते कटेंगे’ आणि ‘एक है तो सुरक्षित है’ या सारख्या घोषणांबद्दल विचारले असता, गडकरी यांनी प्रचार करताना विकास आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य दिल्याचं सांगितलं.
‘निवडणुकीच्या वेळी लोक जे काही करतात त्या मी फारशा केल्या नाहीत. मी काही खरडून काढलं नाही, आरोपही केले नाहीत. माणूस निवडून आला नाही तर मरतो का? मी ते करणार नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List