आम्ही पूर्ण ताकदीनं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढणार, संजय राऊत यांनी व्यक्त केला निर्धार
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आगामी वर्षात एप्रिल महिन्यानंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेने मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवू, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मुंबईत बोलत होते.
माध्यमांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, निवडणुका कधीही लागू द्या. शिवसेनेने मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आम्ही अत्यंत ताकदीने या निवडणुका लढवू. तीन वर्षापासून या निवडणुका रखडवून ठेवल्या असून हरण्याची भीती होती म्हणून मुंबई सारख्या शहराला लोकनियुक्त सरकार म्हणजे महापौर दिला नाही.
विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गाने विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत. नक्कीच घ्या. आमचे कार्यकर्ते, मतदार हा ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा, मराठी माणूस राहावा आणि मुंबई ही राजधानी मराठी माणसाची आहे ती महाराष्ट्रातच राहिली पाहिजे यासाठी प्राणांची बाजू लावून ही निवडणूक लढेल, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था आतापर्यंत कधीही युती किंवा आघाडीत लढल्या गेल्या नाहीत. भाजप-शिवसेना युती असताना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही नाही. या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या असून ज्यांना स्वतंत्रपणे लढायचे आहे त्यांनी लढले पाहिजे आणि कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. हेच बळ लोकसभा आणि विधानसभेला आघाडी युती म्हणून उपयोगाला येते.
फुटणाऱ्यालाही लाज, शरम वाटली पाहिजे
दरम्यान, शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चांवरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राचा, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा जो विचार यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील असे वाटत नाही. दुसरीकडे अजित पवार गटाला भाजपने शरद पवारांच्या पक्षाचे 5 खासदार फोडून आणण्यास सांगितले आहे. सहा खासदारांचा कोटा पूर्ण होईल तेव्हा मंत्रिपद देऊ असे गाजर त्यांना दाखवले आहे. शरद पवारांनी 84व्या वर्षी कष्टाने निवडून आलेले खासदार फोडले जात असून फुटणाऱ्यालाही लाज, शरम वाटली पाहिजे.
महाराष्ट्राचे भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न अदानी करताहेत
गौतम अदानी यांच्या घरी अलिकडे राजकीय चर्चा होतात. ज्यांनी महाराष्ट्राचे विमानतळ ताब्यात घेतले, धारावीसह मुंबईची हजारो एकर जमीन गिळली, सत्ता आल्यावर महाराष्ट्राचे जकातनाते ताब्यात घेतले ते गौतम अदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे. अदानी म्हणजे आचार्य विनोबा भावे, दादा धर्माधीकारी, जमनलाल बजाज, यशवंतराव चव्हाण आहेत का? ते एक उद्योगपती असून नरेंद्र मोदींचा मित्र आहे. मित्र म्हणून महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करत असल्यानेच देशामध्ये गोंधळ सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.
शिंदेंचा विषय संपलेला आहे
मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र शिंदे यांचा आनंद किंवा नाराजी हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. हे सगळे कळसूत्री बाहुली, गुलाम आहेत. गुलामांनी बंडाची भाषा करायची नसते, हे आंबेडकरांचे फार मोठे तत्त्वज्ञान आहे. गुलामाने आपल्या हक्कासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे, ती यांच्याकडे नाही. हे डरपोक लोक आहेत. माझ्यासारखा माणूस कुणाच्या बापाला घाबरत नाही. जोपर्यंत सभ्य आहोत, तोपर्यंत सभ्यतेने राहू. महाराष्ट्राच्या मुळावर यायचा प्रयत्न कराल तर पुन्हा 105 हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आहे आणि त्यात पहिला हुतात्मा संजय राऊत असेल, असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List