RBI ला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी, मेलने उडवली झोप, रशियाशी कनेक्शन; पोलीस झाले अलर्ट
देशभरातील शाळा, एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन्स बॉम्बने उडवण्याची धमकीची प्रकरण सातत्याने वाढत आहेत. या आठवड्यात दिल्लीतल अनेक शाळांना धमकी मिळाली होती. तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही (RBI) स्फोटकांनी उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिचती समोर आली आहे. धमकीचा हा ईमेल गुरूवारी दुपारी आरबीआच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ही माहिती उघड झाली. रिझर्व्ह बँक उडवून देण्याची धमकी असणारा हा ईमेल रशियन भाषेत होता. याआधीही रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यातही आरबीआयला धमकी मिळाली होती.
दिल्लीतील शाळांनाही धमकी
तर या आठवड्यात दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली, तसाच एक मेल आज अर्थात 13 डिसेंबरलाही अनेक शाळांना मिळाला. डीपीएस, मॉडर्न स्कूल, केम्ब्रिज स्कूल, सलवान पब्लिक यांचा त्यात समावेश आहे. शुक्रवारी मध्यरात्री या शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर विविध सुरक्षा एजन्सीजनी शाळेच्या परिसरात तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच पोलिसही उपस्थित होते. यापूर्वी दिल्लीतील किमान 44 शाळांना अशाच प्रकारचे ईमेल आले होते. तपासाअंती या धमक्यांना केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी म्हटले.
सतत वाढत आहेत धमक्या
गेल्या काही महिन्यांत धमकीच्या कॉल्सची संख्या सतत वाढली आहे. कधी शाळेत धमकीचे कॉल येतात तर कधी फ्लाइटमध्ये धमकीचे कॉल मिळत आहेत. विमानं बॉम्बने उडवून देण्याच्या शेकडो धमक्या आत्तापर्यंत मिळाल्या आहेत तसेच काही शाळांनाही अशीच धमकी मिळाली. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. तर आता आरबीआयलाही अशीच धमकी मिळाल्याने चिंतेंचे वातावरण आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List