रिक्षाचालकाची अशीही इमानदारी; महिला प्रवाशाचे साडेआठ तोळे सोने केले माघारी
रिक्षा प्रवास करताना अनेक प्रवाशांना चांगले-वाईट अनुभव येत असतात. मात्र, एका रिक्षाचालकाच्या इमानदारीमुळे महिलेला रिक्षात विसरलेले तब्बल साडेआठ तोळ्यांचे दागिने माघारी मिळाले आहेत. प्रामाणिक रिक्षाचालकाचा पोलिसांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला आहे. राजाभाऊ चंद्रकांत रासकर असे रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासकर हे रिक्षाचालक असून, ते मंगळवार (10 डिसेंबर) सकाळी आठ वाजताच्या सुमारास पानमळा ते स्वारगेट येथे महिला प्रवासी घेऊन जात होते. त्यावेळी संबंधित महिला प्रवाशाची साडेआठ तोळे सोने दागिने ठेवलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. मात्र, त्यांना इच्छितस्थळी सोडल्यानंतर राजाभाऊ दुसऱ्या भाडेकरूला घेऊन मार्गस्थ झाले. रिक्षा सदाशिवपेठेत गेल्यानंतर त्यांना गाडीत पिशवी आढळून आली. त्यानंतर बॅग घेत थेट स्वारगेट पोलीस चौकी गाठली. मात्र, तोपर्यंत स्वारगेट पोलीस ठाण्यात ग्राहकाने बॅग हरवल्याची तक्रार नोंद केली होती.
तक्रारदार महिलेला बोलावून घेत्ल्यानंतर त्यामध्ये साडेआठ तोळे सोने असल्याचे पोलिसांनी रासकर यांना सांगितले. प्रवाशी महिलेला बोलावून बॅग त्यांना सुपूर्द केली. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि पोलिसांच्या मदतीने बॅगेतील संपूर्ण ऐवज जशाचा तसा महिलेला देण्यात आला. रिक्षाचालक रासकर यांच्या प्रामाणिकपणाचे स्वारगेट पोलिसांनी कौतुक करीत त्यांचा सत्कार केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रिक्षाचालकाचा गौरव केला. यावेळी स्वारगेट (नेहरू स्टेडियम) पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक बाळू पोपट सिरसट, पोलीस अंमलदार अमोल काटे, प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List