अॅड. ताके यांच्या खुनाचा आढाव दाम्पत्य खुनाशी संबंध आहे का? अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा सुरू
काही वर्षांपूर्वी अॅड. दिनकर ताके यांचा शेतीच्या वादातून खून झाला होता. या खूनप्रकरणी अॅड. ताके यांच्या भावाला अटक झाली होती. या घटनेसंदर्भात राहुरीतील अॅड. आढाव दाम्पत्य खून खटल्यात माफीचा साक्षीदार हर्षद ढोकणे याने घटनाक्रम सांगताना अॅड. राजाराम आढाव यांच्या डोक्यात पिशवी घालत असताना, ‘माझ्या वडिलांना मारले, आता आम्हालाही मारा,’ असे त्यांच्या पत्नी अॅड. मनीषा आढाव म्हणाल्या होत्या, असे हर्षदने सांगितले होते. यावरून आता अॅड. ताके यांच्या खुनाचा आणि आढाव दाम्पत्याच्या खुनाचा संबंध आहे का, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
अॅड. ताके यांच्या खुनामागे किरण दुशिंग टोळीचा हात आहे का? याचे उत्तर न्यायालयासमोर येईलच; परंतु हर्षद ढोकणे याने माफीचा साक्षीदार होताना पोलिसांना घटनाक्रम सांगितला असताना अॅड. मनीषा आढाव यांनी मृत्यूपूर्वी दुशिंग टोळीसमोर वापरलेल्या वाक्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष का केले असावे. आढाव दाम्पत्य खुनाच्या तपासात अॅड. ताके यांच्या खुनाचा संबंध येतो का? माफीचा साक्षीदार ढोकणे याने न्यायालयासमोर सांगितलेल्या माहितीमुळे अॅड. ताके व आढाव वकील खुनाचे रहस्य पोलिसांनी तपासात बाहेर काढले नाही. हा प्रश्न तसाच राहणार आहे का? असे प्रश्न नागरिक करीत आहेत.
राहुरी न्यायालयातील अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय – 52) व त्यांच्या पत्नी अॅड. मनीषा आढाव (वय – 42) यांचा 25 जानेवारी 2024 रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. दोघांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीतील विहिरीत दगड बांधून टाकले होते. २५ जानेवारीला रात्री गस्तीवर असलेले पोलीस प्रमोद ढाकणे, नदिम शेख यांच्या सतर्कतेमुळे खून झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी किरण नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे, हर्षद ढोकणे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे यांना अटक केली होती.
आढाव दाम्पत्य खूनप्रकरणी सलग तीन दिवस जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सत्र या सुनावणीदरम्यान अॅड. उज्ज्वल निकम यांनी माफीचा साक्षीदार हर्षद ढोकणे याची तपासणी घेताना त्याने अॅड. राजाराम आढाव यांच्या डोक्यात पिशवी घातल्यानंतर अॅड. मनीषा आढाव यांनी, ‘माझ्या वडिलांना मारले, आता आम्हालाही मारा,’ असे ओरडल्या होत्या. या ओरडण्याच्या विधानामागे नेमका काय हेतू होता.
अॅड. दिनकर ताके हे अॅड. मनीषा आढाव यांचे वडील होते. नेवासा येथील शेतीत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅड. ताके यांच्या खुनाशी दुशिंग टोळीचा संबंध आहे का? मरण्यापूर्वी अॅड. मनीषा आढाव यांच्या एका वाक्यामुळे अनेक शंका निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. माफीच्या साक्षीदाराने न्यायालयासमोर आणलेल्या घटनाक्रमातील वाक्याचा त्यावेळी पोलिसांनी तपास का केला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आढाव खून खटल्याची पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे. त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम अॅड. मनीषा आढाव यांच्या वाक्यावर प्रकाशझोत टाकतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List