70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांना निमंत्रण; स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पाठवले पत्र
फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे 70 वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित रहावे म्हणून स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना आज पत्र पाठवले. पंतप्रधान मोदी यांनी संमेलनाचे उद्घाटन करावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी पत्रातून व्यक्त केली. यासाठी ते लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे समजते.
21 ते 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये 98 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यापूर्वी 1954 मध्ये दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन पेंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ होते. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले होते. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर दिल्लीत होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळालाय. त्यामुळे पंतप्रधान मोदींना निमंत्रण द्यावे, अशी साहित्य महामंडळ व आयोजकांची भावना आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात संमेलनाचा उद्घाटन सोहळा करण्याचे नियोजन आहे.
तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधान आले तर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल, लोकांची गैरसोय होईल. म्हणून संमेलनाचे उद्घाटन दुसरीकडे करायचे. बाकी सर्व कार्यक्रम सुरळीतपणे तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असतील, असे साहित्य महामंडळ व संयोजकांनी ठरवले आहे, असे सरहद संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List