‘रामदास आठवले भाजपच्या झाडावर वाढलेलं…’, मनेसच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; जहरी टीका काय?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून जोरदार निशाणा साधला होता. राज ठाकरे यांची या निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, त्यांचे स्वप्न भंग झाले.
राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज आहे, असं आठवले यांनी म्हटलं होतं. दरम्यान आठवले यांच्या या टीकेला आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून आठलेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश महाजन?
माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की आम्ही महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार करू, आमचे हिंदुत्वाचे विचार एकत्र आहेत, रामदास आठवले साहेब तुमचा पूर्ण आदर बाळगून एवढंच सांगू इच्छितो, गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपच्या झाडाच्या खाली आणले. तुम्ही त्या झाडावर चढला आणि आता भाजपच्या झाडाचे बांडगुळ आहात. तुमच्यामुळे भाजपला काही फायदा होत नाही, पण भाजपमुळे तुम्ही अखंड मंत्री पदावर आहात ते तुम्ही लक्षात घ्यावं. दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात आहोत, याचा त्यांनी विचार करावा. त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो कारण त्यांनी माझ्या नेत्यावर आरोप केले आहेत. आठवले यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असा हल्लाबोल प्रकाश महाजन यांनी आठवले यांच्यावर केला आहे.
नेमकं काय म्हणाले होते आठवले?
राज ठाकरे यांची या निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा फायदा नाही, मी असताना त्यांची काय गरज आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला, लोकसभेत अपयश आलं, विधानसभेत यश आलं, आरक्षण जाणार असं सांगणाऱ्याला जनतेनं धडा शिकवला, असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List