मुंबईसह राज्यात पुन्हा थंडीचे पुनरागमन, वातावरण बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
Mumbai Weather Update : मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पुन्हा एकदा तापमानात घट झाली आहे. मुंबईत काल रात्री किमान तापमान 20.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे. त्यामुळे मुंबईत दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावण पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालवली आहे. त्यातच प्रदूषणात वाढ होत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील आठवड्याच्या सुरुवातीला तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने आता मुंबईतील तापमानत घट होण्यास सुरुवात होईल. यामुळे रात्रीच्या वेळी तापमान साधारण 18 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरु शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
शनिवारी IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 20.7 अंश नोंदवले गेले. तर आज 8 डिसेंबरला किमान तापमान हे साधारण 20 अंश इतके राहिल आणि 9 डिसेंबरपासून तापमानात घट होईल. ते 18 अंशापर्यंत घसरेल. गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे मुंबईत शहरात जास्त आर्द्रता आणि पूर्व-दक्षिणपूर्व वाऱ्यांचे प्रवाह निर्माण झाले होते. त्या किमान तापमान जास्त राहिले होते.
मात्र डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबईतील तापमानात वाढ झाली होती. डिसेंबरमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत होते. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला होता. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडला होता. मात्र, आता हंगामातील पहिला वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर २-३ दिवसांत परिणाम करू शकतो. यामुळे किमान तापमान १५-१७°C पर्यंत घसरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातं आहे.
मुंबईकरांची तब्येत बिघडली
तसेच मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली आहे.सध्या प्रदूषण वाढले असतानाच आता दुपारचा प्रचंड उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमध्ये सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या तब्बल २५ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे मुंबईकरांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडीची चाहूल लागताच आजारांना निमंत्रण मिळाले आहे. हवेमध्ये आर्द्रता वाढल्याने धुलिकण वातावरणात जास्त वेळ टिकून राहतात. यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत दिवसा धुरक्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार वेगाने पसरत आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत
या पार्श्वभूमीवर पालिकेची प्रमुख रुग्णालये केईएम, सायन, नायर, कूपर या रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आवश्यक औषधसाठा, आरोग्य सुविधाविषयक साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आली आहेत.
जालन्यात थंडीचे पुनरागमन
मुंबईसह जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून गायब असलेल्या थंडीचे पुनरागमन झाले. शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडीची लाट पसरली आहे. यामुळे तापमानाचा पारा 11 अंशावर गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हुडहुडी पाहायला मिळत आहे. तसेच शेकोट्या पेटू लागल्या आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाल्याने आठवडाभर जिल्ह्याच वातावरण ढगाळ आणि धुक्याचं होतं. दरम्यान पुढील 4 दिवसात थंडीचा पारा अजून घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List