‘पुष्पा 2 साठी पैसे वाया घालवू नका’; पोस्टनंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’ चांगलीच ट्रोल
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा 2: ‘द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अवघ्या तीन दिवसांत त्याने छप्परफाड कमाई केली आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशभरात या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळतेय. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ‘पुष्पा 2’ने देशभरात 115 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 350 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयीचे पोस्ट, व्हिडीओ, रील्स आणि रिव्ह्यूज व्हायरल होत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी 5’ फेम ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिनेसुद्धा या चित्रपटाविषयी एक पोस्ट लिहिली आहे. अंकिताने अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा हा चित्रपट पाहिला असून त्यावर तिचं मत व्यक्त केलं आहे.
अंकिताची पोस्ट-
‘अभिनय – 100 पैकी 100, पण कथानक- निराशाजनक, पुष्पाचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा खूप चांगला होता. कृपया तुमचे पैसे वाया घालवू नका. माझ्या मते मनोरंजन हे शक्तीशाली माध्यम असतं आणि जे चित्रपट मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचतात, त्यांच्याविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे’, अशी पोस्ट अंकिताने लिहिली आहे. अंकिताच्या या स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘तू सांगणार आणि आम्ही ऐकणार का’, असं लिहित एका युजरने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर ‘तुला पण बिग बॉस मराठीमध्ये बघून आमचा वेळ वाया गेलाच आहे ना’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘इतकं बॉक्स ऑफिस कलेक्शन उगाच नाही झालंय’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी अंकिताला चांगलंच ट्रोल केलंय.
‘पुष्पा 2’ने बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम मोडले आहेत. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. या शर्यतीत ‘पुष्पा 2’ने RRR या चित्रपटाला मागे टाकलंय. तर शाहरुख खानच्या ‘जवान’वर मात करत हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपटही ठरला आहे. रविवारी या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं बजेट तब्बल 400 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List