“ते माझ्यासोबत नव्हतेच.. “; गोविंदाबद्दल लेकीने बोलून दाखवली खंत
अभिनेता गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. त्याला आपल्या चित्रपटात साइन करण्यासाठी एकेकाळी त्याच्या घराबाहेर दिग्दर्शकांची रांग लागायची. गोविंदाने करिअरच्या शिखरावर असताना सुनिता अहुजाशी लग्न केलं. त्यांना यशवर्धन हा मुलगा आणि टीना ही मुलगी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची मुलगी टीनाने वडिलांविषयीची खंत बोलून दाखवली. टीना लहानाची मोठी होत असताना गोविंदाने तिच्यासोबत फार वेळ घालवला नव्हता. त्यावेळी तो सतत कामात व्यस्त असायचा. अशावेळी आई सुनिताच तिच्यासोबत अधिक वेळ असायची. जेव्हा गोविंदाचं शेड्युल सुनिताने तिच्या हाती घेतलं, तेव्हा टीनाला वडिलांसोबत घालवण्यासाठी थोडाफार वेळ मिळू लागला होता. टीनाने वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तिला अपेक्षित यश मिळालं नाही.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत टीना म्हणाली, “लोकांना हे माहित नाही, पण माझे वडील फार क्वचित माझ्या शाळेत यायचे. मी शाळेत शिकत असताना वडिलांनी माझ्यासोबत फारसा वेळ घालवला नव्हता. आईच सर्वकाही करायची. बाबा फार क्वचित माझ्यासोबत असायचे. एकतर ते हैदराबाद किंवा स्वित्झर्लंडला असायचे. पण मला नंतर वडिलांसोबत काम करायला आवडू लागलं होतं. लोक माझ्याकडे अधिक लक्ष आणि महत्त्व देऊ लागले होते.”
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत सुनितानेही सांगितलं होतं की टीनाच्या जन्माच्या वेळीही गोविंदा उपस्थित नव्हता. “जेव्हा आमच्या मुलीचा जन्म झाला, त्याच दिवशी त्याला पाच शिफ्टमध्ये काम करावं लागलं होतं. माझ्यासोबत माझी सासू होती. प्रत्येक शिफ्ट संपल्यानंतर तो माझ्या प्रकृतीविषयी आणि बाळाविषयी विचारपूस करायचा. जेव्हा त्याची तिसरी शिफ्ट सुरू होती, तेव्हा टीनाचा जन्म झाला होता”, असं सुनिताने सांगितलं होतं. गोविंदा आणि सुनिता यांनी काही महिन्यांपर्यंत त्यांचं लग्न लपवून ठेवलं होतं. टीनाच्या जन्मानंतर अनेकांना त्यांच्या लग्नाविषयी समजलं होतं. गोविंदा आणि सुनिताने 1987 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List