निवडणुकीच्या धामधुमीत कॉमनमॅनच्या भावनांना साजेसं रॅप साँग; तरुणांकडून भरभरून प्रतिसाद
निवडणूक आली की वातावरण बदलून जातं. आश्वासनांची, घोषणांची खैरात केली जाते. एरव्ही सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या असणारा मतदारवर्ग निवडणूक आल्यावर मात्र एकदम प्रकाशझोतात येतो. राज्यात आता निवडणुकीची धामधूम असताना कॉमनमॅनच्या भावनांना साजेसे असे एक रॅप नुकतेच सोशल मीडियावर आले असून या रॅपला तरुणाईचा कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. पटाखा फिल्म्सच्या आरती साळगावकर, सुहास साळगावकर यांनी कॉमनमॅन या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. राकेश शिर्के यांनी लिहिलेलं रॅप गाणं प्रफुल्ल स्वप्नील यांनी संगीतबद्ध केलं आहे. वरूण लिखते यांनी रॅप गायलं आहे. रॅप हा गीतप्रकार विद्रोही म्हणून ओळखला जातो. राजकारण, निवडणुकीत सर्वसामान्यांचं काय होतं याचं वास्तव या रॅपमधून मांडण्यात आलं आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत नवनवी प्रचार गीतं येत असताना सर्वसामान्यांच्या भावना मांडण्याची तसदी फारशी कोणी घेतलेली दिसली नाही. ती उणीव या कॉमनमॅननं नक्कीच भरून काढली आहे. राजकीय पक्ष त्यांना साजेशा अशा अनेक गोष्टी करतात. मात्र सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यापासून ते अगदी रस्त्यावरील खड्यांपर्यंत अनेक प्रश्नांना दररोज तोंड द्यावं लागतं. वर्षांनुवर्षं वाट पाहूनही या समस्या मात्र काही सुटत नाही. केवळ शांत राहून घडणाऱ्या घडामोडी बातम्यांतून पाहत बसण्याची वेळ मात्र या कॉमनमॅनवर येते, हे सूत्रसमोर ठेवूनच हे कॉमनमॅनचं रॅप करण्यात आलं आहे.
हा रॅप साँग प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हीच रिॲलिटी आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे जबरदस्त रॅप साँग आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List