“त्यांना गमावल्यानंतर..”; वडिलांच्या आत्महत्येबद्दल पहिल्यांदाच मलायका अरोरा व्यक्त
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता सप्टेंबर महिन्यात मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या इमारतीखाली मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी सहाव्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय होता. अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते. वडिलांच्या निधनानंतर मलायका तिच्या आईला आणि कुटुंबाला सावरताना दिसली. यावेळी तिचा पूर्व पती अरबाज खान, खान कुटुंबीय आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची तिची खूप मदत केली. आता वडिलांच्या निधनानंतर मलायका पहिल्यांदाच त्यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
“आपल्या सर्वांना पुढे चालत राहावंच लागतं. मीसुद्धा माझ्या आयुष्यात पुढे जावं अशी माझ्याही वडिलांची इच्छा असती. त्यांना गमावल्यानंतर मी त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्या वेळेसाठी मी कृतज्ञ आहे. त्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं पण स्वत:ला सावरण्यासाठी थोटा वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. पुन्हा कामावर परतल्याने मी हळूहळू त्यातून बाहेर पडू शकते. माझं जितकं लक्ष कामावर असेल, तितकी मी मानसिकदृष्ट्या स्थिर राहीन. त्याचसोबत माझी आई आणि माझ्या कुटुंबाचीही मला नीट काळजी घेता येईल. मी एका खास प्रोजेक्टवर सध्या काम करतेय. त्याची घोषणा मी लवकरच करेन. तो प्रोजेक्ट म्हणजे माझ्या वडिलांसाठी श्रद्धांजली असेल”, असं मलायकाने सांगितलं.
मलायकाचे सावत्र वडील अनिल अरोरा हे अनिल मेहता म्हणून प्रचलित होते. ते वांद्रे इथल्या आयेशा मनोर या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत होते. घटना घडली त्यावेळी घरात मलायकाची आई जॉईस आणि सावत्र वडील अनिल हे दोघेच होते. ते काही काळ एकत्र बोलत बसले होते. त्यानंतर अनिल तिथून उठले आणि गच्चीच्या दिशेने गेले. बराच वेळ परत न आल्यामुळे जॉईस तिथे गेल्या. त्यावेळी त्यांना पतीच्या चपला सापडल्या. त्यांनी टेरेसवरून वाकून पाहिलं असता ते खाली पडलेले दिसले. त्यावेळी इमारतीचा सुरक्षारक्षकही मदतीसाठी ओरडत होता, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं. अनिल हे मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होते. काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. आत्महत्येपूर्वी काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली असल्याचंही म्हटलं गेलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List