Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात
राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसंतसे नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता राज्याच्या राजकारणात मोठे उद्योजक गौतम अदानी यांची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. संजय राऊत यांनी महायुतीवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानी यांचा हात होता, हे स्पष्ट होते. त्यांना हे सरकार अडचणीचं ठरत होते, असा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे हा मुद्दा अजून तापणार हे स्पष्ट होत आहे.
त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची
कुणाच्या अंगात आलं होतं, हे अजितदादांनी एकदा तपासावं. अडीच वर्षे आम्ही चांगल्या प्रकारे सत्ता राबवली. पण गौतम अदानी यांना महाविकास आघाडीचं सरकार नको होतं. ही मुंबई, महाराष्ट्र अदानी यांना गिळायचा आहे. विकत घ्यायचा आहे. ओरबडायचा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी अगोदर शिवसेना तोडली. त्यासाठी अदानींचा वापर केला हे या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा सांगत आहेत. शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी तोडण्यामागे गौतम अदानी हे होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे अदानी होते, हे अजित पवार कबूल करत आहेत. यापेक्षा कोणताही मोठा पुरावा असू शकतो का? असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
ही मुंबई उद्योजकांना विकण्याचा डाव मोदी,शाह, फडणवीस यांनी केला आणि खेळला. तो यशस्वी झाला. त्यामुळे आमची या निवडणुकीतील लढाई ही गौतम अदानी आणि त्यांच्या व्यापारी वृत्तीविरोधात आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अदानी हे एकच आहेत. या राज्यातील सूत्र अदानी यांना त्यांच्या हातात हवी आहेत. त्यामुळेच त्यावेळी अदानी यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List