मशाल अशी पेटून धगधगू द्या की, भ्रष्टाचाऱ्यांच्या बुडाला आग लागली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची गर्जना
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापूरात सभा झाली. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा झाली. मशाल ही निशाणी आता हृदयात आणि घराघरात पोहचली आहे. ही मशाल पेटून धगधगायला हवी. ती अशी पेटली पाहिजे की, भ्रष्टाचाऱ्यांच्या बुडाला आग लागली पाहिजे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
आता आपण प्रचारासाठी फिरत आहोत. जनतेचा उत्स्फूर्त प्रिसाद मिळत आहे. राज्यात आता भगवे वादळ निर्माण झाले आहे. येथील समस्या मांडण्यात आल्या. त्या सोडवायच्या असतील तर अमरदादा यांना निवडून द्यावेच लागेल. आता निवडणुका आल्याने सर्व पक्षांचे अनेक नेते येत चिखलफेक करत आहेत. देशाचे पंतप्रधान देशाचा कारभार सोडून महाराष्ट्रात फिरत आहे. स्वतःचा चेहरा दाखवायला लाज वाटते म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मतं मागत आहे. राज्यात मोदी गॅरंटीला महत्त्व नाही.
काही वर्षापूर्वी मोदींची नोटबंदी केली होती. आता महाराष्ट्राने मोदींची नाणेबंदी केली आहे. त्यांचे नाणे चालतच नाही. सर्व फुकट्या गॅरंटी. त्यातील कोणती गॅरंटी यशस्वी झाली ते त्यांनी सांगावे. 2014 पासून त्यांच्या थापा आणि जुमलेबाजी सुरू झाली आहे. 2 कोटी बेरोजगारांना रोजगार मिळणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार, कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही.
पंतप्रधान नांदेड येथील सभेत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन शब्द चांगले बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांचे भाषण लिहीणारा सुटीवर गेला असेल किंवा त्यांचा टेलिप्रॉमटर बिघडला असेल.टेलिप्रॉमटर बिघडला असेल तर मिंध्यांचा टेलिप्रॉमटर घेऊन जा. मिंधेचा टेलिप्रॉमटर कोण तर धरण फोडणारा खेकडा…तो मागू सांगतोय. मिंधे बोलतोय, हे सगळ्यांनी पाहिले आहे. मोदी यांनी आठवत नसेल लोकसभा निवडणुकीवेळी शिवतीर्थ येथील महाविकास सभेपूर्वी तेथील बाळासाहेबांच्या स्मतीस्थळी जाऊन अभिवादन केले होते. हे तुमच्या हेरांना तुम्हाला सांगितले नसेल तर तो व्हिडीओ मी तुम्हाला पाठवतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमचे घरातील चूल पेटवणारे हिंदुत्व त्यांना नको आहे. त्यांना जातीपातीत द्वेष निर्माण करत स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे. अशा या नतद्रष्ट भाजपला मी लाथ मारली म्हणून आता त्यांना पोटदुखी होत आहे. भाजपा म्हणजे भामटा जगला पाहिजे अशी क्लिप फरित आहे. त्यांनी सगळे भामटे एकत्र केले आहे, ही मोदी गॅरंटी आहे. माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी आता गुलाबी जॅकेटला सोबत घेतले होते, त्यांनी आता मुंबईत नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. ते आधी मंत्रिमडळात माझे सहकारी होते. त्यांना भाजपने ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून अटक करत त्यांना तुरुंगात टाकले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्यासोबत हे मांडीला मांडी लावत बसत आहे. याबाबत आमच्याकडे ठोस पुरावा आहे. आता त्यांनी तो पुरावा त्यांनी कोठे ठोसला, असा सवालही त्यांनी केला.
नवाब मलिक अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत. मोदींची सभा होणार आहे. त्यावेळी घटक पक्षाचा उमेदवार म्हणून मलिक यांना व्यासपीठावर घेणार की नाही, हे मोदी यांनी स्पष्ट करावे. त्यांना व्यासपीठावर घेणार नसाल तर अजित पवार यांना माझा सवाल आहे की, तुमचा पक्षाचा उमेदवार नाकारणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नेता मानता का, असा सवाल त्यांनी केला. यातील एकजण तरी खेर बोलत असणार. अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असूच शकत नाही. मी त्यांना अनेक वर्षे ओळखतो. ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारासाठी मी जाणारच असे त्यांनी स्पष्ट केले आहे. असा घटकपक्षासोबत मोदींना युती चालते.
अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना कचरापेटीत टाकले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हांला वाचवले होते. आज त्यांचा शिवसेना पक्ष तुम्ही फोडला आणि तो पक्ष संपवायला निघाले आहात. राहुल गांधी यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यांनी मला कधीही नकली संतान म्हटले नाही. ते पाप तुम्ही केले आहे आणि त्यांचे सर्किटभाई यांनीही मला आव्हान दिले आहे. कश्मीर आणि 370 कलम आम्ही हटवले, त्यावर मी बोलावे, असे आव्हान दिले होते. मात्र, त्यावेळी आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, हे कलम हटवल्यानंतर अदानी सोडून इतर किती जणांनी तेथे जमीनी विकत घेतल्या, हे त्यांनी सांगावे. मोदी यांना माझे आव्हान आहे की, बदलापूर येथील अत्याचार झालेल्या चिमुरडीच्या आईला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देऊन दाखवा,असे उद्धव ठाकरे म्हणाले. महिलांना सुरक्षाच नसेल तर त्या पैशांचे काय करायचे आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
मुस्लीम समुदाय मोठ्या संख्येने आल्याने भाजपला पोटदुखी होत आहे. ते हिंदुत्व करत आहेत तर कश्मिरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत युती कशी केली, चंद्राबाबू नायडू यांचा जाहीरनामा त्यांना मान्य आहे काय? मोहन भागवत यांनी जामा मशीदीला भेट दिली होती. तसेच मोदीही मशीदीत का जात असतात. त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आपण येथे आलो आहोत. तसेच दाढीवाला दाढी खाजवेल तिथे पैसे काढतोय. या 50 खोक्यांचा सूड तुम्हाला घ्यावा लागेल, गद्दारांना 50 कोटी आणि माताभगिंनींना फक्त 1500 रुपये मिळतात. त्यांना पैशांची मस्ती आली आहे. ती आपल्याला उतरवावी लागेल. आपण महाराष्ट्रासाठी, राज्याच्या विकासासाठी मोठे स्वप्न बघत आहोत. मात्र आता अपक्षांचे मांजर आडवे जाऊ देऊ नका. मतविभागणीसाठी त्यांनी अपक्ष उभे केले आहेत. त्यामुळे आता अपक्षांच्या मतविभाजनाच्या डावाला भूलू नका. हातात मशाल घेतली आहे तर ती आता पेटवा आणि धगधगत ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.एकजूटीत आता तूटफूट नको. महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो मे बाटेंगे हे रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठिशी उभे राहा. माझे आता मोदींना आव्हान आहे. राहुल गांधी मणीपूरला जाऊन आले. तुम्ही आतापर्यंत मणीपूरला भेट दिलेली नाही. तुम्ही मणिपूरला भएट देत तिथे शांतता प्रस्थापित करा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List