याच संसदेत जातिनिहाय जनगणनेचे विधेयक पास करुन दाखवू, राहुल गांधी यांचा विश्वास
जातीनिहाय जनगणनेवरून देशात राजकारण सुरू असताना तेलंगणात काँग्रेस सरकारकडून बहुप्रतिक्षित जातीनिहाय जनगणना सुरु झाली आहे. यावरुन आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीजी देशभरातील जातिनिहाय जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातिनिहाय जनगणनेचे विधेयक पास करुन दाखवू आणि आरक्षणावरील 50 टक्क्यांची भिंत तोडू असे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यानुसार, तेलंगणा सरकारने 6 नोव्हेंबर रोजी सत्तेत देशव्यापी सामाजिक-आर्थिक जातीनिहाय जनगणना सुरु केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर सर्वेक्षणाचा एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, मोदी जी, आजपासून तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. यामधून मिळणाऱ्या माहितीचा वापर आम्ही राज्यातील प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी धोरणे बनविण्यासाठी करणार आहोत. लवकरच ती महाराष्ट्रातही होणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांनी पुढे लिहीले आहे की, भाजपला देशात सर्वसमावेशक जातिनिहाय जनगणना करायची नाही. मी मोदींना स्पष्ट शब्दात सांगू इच्छित आहे की, तुम्ही देशभरातील जातिनिहाय जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातिनिहाय जनगणनेचे विधेयक पास करुन दाखवू आणि आरक्षणावरील 50 टक्क्यांची भिंत तोडू असे राहुल गांधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List