इथून पुढील सगळे दिवस…. सुनील बर्वेंची अतुल परचुरेंसाठी भावनिक पोस्ट
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे 14 ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.
गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट मालिका नाटकांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या अतुल परचुरेंचे अनेक कलाकारांसोबत चांगले संबंध होते. कर्करोगातून बरे होऊन लवकरच ते पुन्हा एकदा रंगभूमीवर कमबॅक करणार होते. त्यांच्या सुर्याची पिल्ले या आगामी नाटकाच्या तालिमीलाही सुरुवात झाली होती. मात्र कर्करोगामुळे त्यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अतुल परचुरे यांना जाऊन दहा दिवस झाले आहेत. त्यानिमित्ताने अभिनेते सुनील बर्वे .यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ”आज दहा दिवस झाले! एक दिवसही तुझ्या आठवणी शिवाय गेला नाही! आणि इथून पुढील सगळे दिवस…. जवळ जवळ 39 वर्षांची आपली मैत्री!! दीड महिन्यांचा अमेरिका दौरा सोडला तर सलग इतके दिवस तू माझी किंवा मी तुझी आठवण काढायचं काही कारणंच नव्हतं. सुयोगच्या त्या अमेरिकेच्या दौऱ्याहून परतल्यावर आपण म्हंटलं होतं, आता वर्षभर तरी तोंडं नको पाहूया! पण आता तू असं काहीतरी केलंयस, की रोज येणार रे तुझी आठवण! माझ्या पहिल्या नाटकापासून तुझ्या शेवटच्या नाटकापर्यंतची आपली मैत्री, केवळ आनंददायी! कधीही न विसरता येणारी! कधीही भरून न काढता येणारी! पण मनापासून सांगतो, जरा घाई केलीस यार!! फोटोरूपी आठवणी मोजक्याच आहेत, (आपल्या काळी का नव्हते मोबाईल कॅमेरे?) त्यातल्या त्यात आपल्या सूर्याची पिल्लेच्या फोटोशूटच्या वेळेचे काही गोड क्षण!!”, अशी पोस्ट सुनील बर्वे यांनी शेअर केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List