मिंधेंचे आमदार सुहास कांदेंचे वांदे; आई-बहिणीवरून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अधिकृत उमेदवारांसह अनेक हौशा-नवश्या आणि बंडखोरांनीही वाजतगाजत अर्ज दाखल केले. अनेक ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडल्याचेही यानिमित्ताने दिसून आले.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथेही मिंधेंचे आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंड करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे मिंधे आणि अजित पवार गटामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. ऐन दिवाळीत मिंधे आणि अजित पवार गटात वादाचे फटाके फुटत आहेत. अशातच मिंधे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे वांदे झाले असून त्यांच्याविरोधात नांदगाव पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सुहास कांदे यांनी यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्याविरोधात नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद शेलार, शेखर पगार याली सुहास कांदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील जैन धर्मशाळा येथे प्रचार सभेचे आयोजन केले होते. येथे भाषण केल्यामुळे सुहास कांदे यांनी मला फोन करून आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे शेखर पगार यांनी केलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तर समीर भुजबळ यांचा अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गेलो असता सुहास कांदे यांनी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार विनोद शेलार यांनी दिली आहे. या तक्रारीवरून सुहास कांदे यांच्याविरोधात भादवि कलम 351 (3), 351(4), 351 (2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List