मिंधे आणि भाजपच्या काळात एक नवा रुपयाही महाराष्ट्रात आला नाही, आदित्य ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्ला
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते तेव्हा केंद्रात मोदी सरकार होते, पण आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन करून साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली होती. तामिळनाडूतही बिगरभाजपा सरकारने सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली होती. भाजपप्रणित मिंधे सरकारने तर दिल्लीत त्यांचे सरकार असतानासुद्धा गेल्या दोन वर्षांत एक नवा रुपयाही महाराष्ट्रात आणलेला नाही, असा जोरदार टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज लगावला.
आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आज पत्रकार परिषद बोलवून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्य आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असेल तर उद्योग आणि गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात येऊ शकते असे केंद्रीय परराष्ट्र मंत्री मुंबई दौऱयात म्हणाले होते. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि रोजगार गुजरातमध्ये गेले. देवेंद्र फडणवीसही आता नागरपूरसाठी काम करत नाहीत, नाहीतर मिहानमध्ये टाटा एअरबस प्रकल्प आला असता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईवर भाजप-मिंधेंचा दुष्ट डोळा… मुंबईला मारायला निघालेत
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल आणि बेस्टला कमजोर करून मुंबईकरांना न परवडणारी खासगी सेवा घुसवण्याचे भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे षड्यंत्र आहे, मुंबईवर भाजप आणि मिंधेंचा दुष्ट डोळा आहे, ते मुंबईला मारायला निघालेत, असा जोरदार हल्लाही आदित्य ठाकरे यांनी केला.
बेस्ट बसेसची सेवा कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱया मिंधे सरकारवर ते अक्षरशः तुटून पडले. ते म्हणाले की, कष्टकरी मुंबईकर ही मुंबईची खरी ताकद आहे. दिवसरात्र मेहनत करणारा, घाम गाळणारा मुंबईकर सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतो, त्याला न परवडणारी आणि साहेबजाद्यांना वापरण्यासाठी खासगी सेवा मुंबईत आणण्याचे हे षड्यंत्र आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बेस्ट बसेसमधून रोज 33 ते 35 लाख लोक प्रवास करतात. 5 रुपयांत 5 किमी, 10 रुपयांत 10 किमी, 15 रुपयांत 15 किलोमीटर आणि 20 रुपयांत आपण इलेक्ट्रीक एसी बसेसमधून कुठेही जाऊ शकतो.
2027पर्यंत महापालिकेतून बेस्टला आर्थिक मदत द्यायची आणि नव्या दहा हजार इलेक्ट्रीक बसेस मुंबईत आणायचे महाविकास आघाडी सरकारचे धोरण होते. 900 डबलडेकर बसेस आणायच्या होत्या. त्या दिशेने कामही सुरू झाले होते; पण काही दिवसांत महाविकास आघाडी सरकार पडले आणि ते काम थांबले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मिंधे सरकारच्या काळात मुंबईतील बसेस साडेतीन हजारांवरून अडीच हजारांवर आल्या आहेत. मिंधे सरकार पुन्हा आले तर तो आकडा अडीचशेवर येईल, अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. रेल्वेत मेगाब्लॉक होत आहेत. ‘रील’ मंत्री की रेल्वे मंत्री आहेत हेच कळत नाही इतके अपघात होत आहेत. दुसरीकडे बेस्टला मारण्याचे काम सुरू आहे, याकडे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
भाजपा राज्यातील धनलक्ष्मी गुजरातला नेतेय
राज्यातील आपले धन आणि लक्ष्मी भाजपा गुजरातला घेऊन जात आहे. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, वेदांता पह्क्सकॉनसुद्धा गेला. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. एअरबस टाटाचा प्रकल्प नागपूरच्या मिहानला येणार होता. पण तो गुजरातला गेला. त्या बदल्यात भाजपने चांगला प्रकल्प महाराष्ट्राला दिला नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर काल गुजरातमध्ये मोदींकडून रोड शो करण्यात आला. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्या रोड शोने केले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपच्या वतीने निवडणूक लढवणारे महाराष्ट्रद्रोही
भाजपला पाठिंबा देणारे, त्यांच्या वतीने निवडणूक लढवणारे महाराष्ट्रद्रोही आहेत. अदानीला फुकटात मुंबई देणाऱयांबरोबर राहणार का याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी वरळीतून रिंगणात उतरलेले मिलिंद देवरा यांच्यावर साधला. मराठी-गुजराती वाद नाही, पण महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, झारखंड विरुद्ध गुजरात असा वाद भाजप निर्माण करतेय, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दोन वर्षांनंतर गद्दारांना वास्तव कळतेय
उद्धव ठाकरे हे देवमाणूस आहेत. मी त्यांना फसवले आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी दगाफटका केला, असे आरोप मिंधे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी केले आहेत. त्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांनंतर आता हे वास्तव अनेकांना कळलेय. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख बनून सर्वांना सांभाळले. पक्षाच्या पलीकडे जाऊन जपले होते, तरीही त्यांच्याशी गद्दारी केली गेली, असे ते म्हणाले.
मलिकांना उमेदवारी… मिंध्यांनी उत्तर द्यावे
नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांना टोचले. दाऊदशी संबंध आहेत त्यांच्या बाजूला बसणार नाही, असे एकेकाळी बोलणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता याचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
फडणवीसांच्या नागपुरात परिवर्तन होईल
देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील आणि नागपूरमधील प्रकल्प बाहेर जात असल्याचे वाईट वाटत नाही का, असा सवाल करतानाच आदित्य ठाकरे यांनी रोजगार नागपूरमधून बाहेर गेले हे नागपूरकरांना माहीत असल्याने आता नागपूरमध्ये परिवर्तन नक्कीच होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
परभणीत आवाज शिवसेनेचाच
परभणीतील शिवसेनेचे उमेदवार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत प्रचंड गर्दी उसळली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List