सामना अग्रलेख – मेक इन गुजरात, चाचेगिरीच!
समुद्रात अनेकदा चाचेगिरी चालते. महाराष्ट्रातील रोटी, कपडा, मकान पळवून गुजरातला न्यायचे हीसुद्धा एक प्रकारे चाचेगिरी आहे. गुजरातसह देशातील प्रत्येक राज्य प्रगतिपथावर जावे, संपन्न व्हायलाच हवे, पण इतर राज्यांचे खजिने लुटून हे उद्योग करता येणार नाहीत. गुजरात हे भारतातील एक राज्य आहे. इतर राज्यांना मोदींच्या वर्तणुकीमुळे गुजरातविषयी दुस्वास वाटत असेल तर त्यास पंतप्रधान जबाबदार आहेत. म्हणून मोदी यांनी ही चाचेगिरी थांबवायला हवी.
दिवाळीच्या सणात महाराष्ट्राला वेदना देणारी बातमी आली आहे. या बातमीने महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार पंतप्रधान मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी टाटा-एअरबस ‘सी-295’ विमान प्रकल्पाचे उद्घाटन सोमवारी बडोद्यात केले. हा प्रकल्प आधी महाराष्ट्रात म्हणजे नागपूरला उभारला जाणार होता, पण मोदी व शहा यांनी दबाव टाकून हा प्रकल्प गुजरातला पळवला. विदर्भाच्या विकासाचा बॅकलॉग का? याचे उत्तर मोदीसारख्यांनी विदर्भाच्या तोंडचा हा असा घास पळवला यात आहे. या प्रकल्पामुळे नागपुरात हजारो कोटींची गुंतवणूक झाली असती व विदर्भातील हजारो हातांना काम मिळाले असते, पण गुजरातच्या हितासाठी पंतप्रधान मोदी यांनी विदर्भाच्या ताटात माती कालवली. बडोद्यात टाटा एअरबस प्रकल्पाचे उद्घाटन झाले व त्यासाठी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना खास आमंत्रित केले. मोदी यांच्या प्रत्येक कृतीतून असे दिसते की, त्यांना देशाचा आवाका अद्यापि कळलेला नाही. आपण भारताचे नव्हे, तर गुजरातचे पंतप्रधान आहोत व सर्व सोयीसुविधा, फायदे फक्त गुजरातलाच मिळावेत यासाठी ते महाराष्ट्रासह इतर राज्यांचे हक्क मारीत आहेत. उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबरला होता. तो आता घसरून पाचव्या क्रमांकावर गेला. हे का? तर महाराष्ट्राकडे येऊ पाहणारे सर्व उद्योग मोदी यांनी गुजरातला वळवले. हे त्यांच्या दुष्ट वृत्तीचे व कोत्या मनाचे लक्षण आहे. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेचा प्रकल्प होता. या प्रकल्पात ‘सी-295’ या मालवाहू विमानांची निर्मिती करण्यात येईल. खासगी प्रकल्पात तयार होणारे ‘सी-295’ हे देशातील पहिले विमान असेल. आता भारत व स्पेनच्या भागीदारीतून हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये उभा राहील व महाराष्ट्र
मोदी-शहांच्या नावाने
तोंडास पाने पुसून घेईल. मोदी हे नेहमीच ‘मेक इन इंडिया’चा नारा देतात, पण त्यांच्या मनात सब कुछ गुजरात म्हणजे ‘मेक इन गुजरात’चीच योजना आहे व ते ही योजना तडीस नेत आहेत. महाराष्ट्राने जे जे निर्माण केले ते सर्व गुजरातला न्यावे असे त्यांचे मानस आहे. शक्य असेल तर गेटवे ऑफ इंडियादेखील ते गुजरातला नेतील. शरद पवार यांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेला ‘शिवसेना’ हा पक्ष तोडून, विकत घेऊन त्यांची मुख्यालये मोदी-शहांनी गुजरातेत हलवली. त्यामुळे या पक्षांचे नेतेही गुजरातचे चाकर बनले. महाराष्ट्र प्रत्येक गोष्ट गमावत आहे व त्या बदल्यात गुजरातची कमाई होत आहे. महाराष्ट्रात एक दुबळे सरकार बसवून ही लूट राजरोस चालली आहे. 25 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प मोदी महाराष्ट्रातून पळवतात व राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे दोन उपमुख्यमंत्री गप्प बसतात, महाराष्ट्रावरचा अन्याय उघड्या डोळ्याने पाहतात. महाराष्ट्राला विकास व भरभराटीपासून वंचित ठेवण्याचा हा कट नक्कीच आहे. महाराष्ट्राचे सरकारच डरपोक निघाल्यावर मोदी-शहांच्या नावाने खडे फोडण्यात काय अर्थ? पंडित नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंतच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे महत्त्व जाणून येथे अनेक राष्ट्रीय प्रकल्प उभे केले. पेट्रोलियम, भाभा अॅटॉमिक, ओएनजीसी, आयआयटी अशा अनेक प्रकल्पांना चालना दिली. संरक्षण उत्पादनविषयक भव्य प्रकल्प उभे केले. मुंबईस आर्थिक केंद्र बनवून देशाला ताकद देण्याचे काम केले. टाटा, अंबानी, बिर्ला अशा उद्योगांचे मूळ मुंबईच्या भरभराटीत आहे. मोदी काळात देशाच्या औद्योगिक भरभराटीच्या मुळावरच घाव घातला जात आहे. मोदी परदेशात जातात तेव्हा गौतम अदानी हे सदैव त्यांच्याबरोबर असतात.
परदेशात व देशातील परदेशी
गुंतवणुकीचे भागीदार इतर कोणी उद्योगपती नसावेत, यास काही राष्ट्रीय अर्थ धोरण म्हणता येणार नाही. सर्व राष्ट्रीय संपत्तीचे मालक अदानी हे मोदींचे मित्र होणार असतील तर देशातील समता व समाजवाद संपला आहे. मोदी यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला व त्या अन्यायावर मुख्यमंत्री शिंदे हे मिंधे बनून मोदींचे भजन गात राहिले. मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातच्या गिफ्ट सिटीत नेले. 2006 साली हेच केंद्र मुंबईत स्थापन व्हावे यासाठी तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी खास प्रयत्न केले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जमीन या केंद्रासाठी निश्चित केली, पण मोदींनी हा प्रकल्प गुजरातला नेला व महाराष्ट्र पाच लाख नोकऱ्यांना मुकला. मुंबईतील हिरे उद्योग, वेदांत फॉक्सकॉन कारखाना, मुंबईचा वस्त्रोद्योग यांसह अनेक प्रकल्प व संस्था मोदी काळात गुजरातकडे पळवल्या गेल्या. ही एक प्रकारे चाचेगिरी आहे. समुद्रात अनेकदा चाचेगिरी चालते. सोमालियासारख्या देशात गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारीला कंटाळून तेथील लोकांनी समुद्रातील चाचेगिरीचा मार्ग निवडला. समुद्रमार्गे जाणाऱ्या बोटी, जहाजे, मालवाहक जहाजांवर दरोडे टाकून बोटीवरील लोकांना बंधक बनवून लुटमार व खंडणी मागायची हा त्यांचा धंदा आहे. रोटी, कपडा, मकानशी संबंधित हे विषय आहेत. महाराष्ट्रातील रोटी, कपडा, मकान पळवून गुजरातला न्यायचे हीसुद्धा एक प्रकारे चाचेगिरी आहे. गुजरातसह देशातील प्रत्येक राज्य प्रगतिपथावर जावे, संपन्न व्हायलाच हवे, पण इतर राज्यांचे खजिने लुटून हे उद्योग करता येणार नाहीत. गुजरात हे भारतातील एक राज्य आहे. इतर राज्यांना मोदींच्या वर्तणुकीमुळे गुजरातविषयी दुस्वास वाटत असेल तर त्यास पंतप्रधान जबाबदार आहेत. म्हणून मोदी यांनी ही चाचेगिरी थांबवायला हवी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List