चार वर्षांच्या मुलाचे अपहरण, लोकमान्य टिळक टर्मिनस येथील घटना
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे वडिलांसोबत झोपलेल्या चार वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास रेल्वेची गुन्हे शाखा करत आहेत.
तक्रारदार हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. त्यांना सहा मुले आहे. दरवर्षी ते दिवाळीच्या काळात मुंबईत येतात. गेल्या आठवडय़ात ते पत्नी आणि सहा मुलांसोबत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आले होते. दिवसभर भिक्षा मागितल्यानंतर ते मुलासोबत टर्मिनसच्या बाहेर झोपत होते. रविवारी रात्री ते पत्नी आणि मुलासोबत झोपले. चार वर्षांचा मुलगा वडिलांसोबत झोपला होता. पहाटे तक्रारदार हे उठले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा जागेवर दिसला नाही.
त्यामुळे त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. काही तास शोध घेतल्यानंतर याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनीदेखील मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मुलाचा फोटो नव्हता. त्यामुळे मुलाला शोधण्यात अडचणी येत होत्या. पोलिसांनी त्या मुलाचे स्केच तयार केले. मुलाच्या अपहरणप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. कुर्ला रेल्वे पोलिसांनी सोमवारी संपूर्ण दिवस रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडेदेखील चौकशी केली. तसेच आज पहाटेपर्यंत पोलिसांचे पथक हे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तैनात होते. कुर्ला रेल्वे पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण कक्ष, रेल्वे पोलिसांची गुन्हे शाखा हेदेखील त्या मुलाचा शोध घेत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List