नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चर्चा, आता भाजपची भूमिका काय? आशिष शेलार स्पष्टच म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नवाब मलिक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असल्याची माहिती आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली. “भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही”, असं नवाब मलिक स्पष्ट म्हणाले आहेत.
“भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही”, असंदेखील आशिष शेलार म्हणाले.
भाजप सना मलिकांना सपोर्ट करणार का?
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत आशिष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही”, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
नवाब मलिक यांच्या उमेदवारीस भाजपचा आधीपासूनच विरोध आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यासच भाजपचा विरोध होता. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र पाठवत विरोध केला आहे. नवाब मलिक यांना पक्षात सहभागी करुन घेतल्यास महायुतीत आपली मैत्री तुटूव शकते, असे स्पष्ट संकेतदेखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यानंतर आता नवाब मलिक यांना थेट राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवारांना नवाब मलिकांच्या पक्षप्रवेशावर इशाऱ्या देणाऱ्या भाजपचा मलिकांना राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या उमेदवारीस मूक संमती आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List