“मी त्याची खूप मोठी फॅन..”; आईचे ते शब्द ऐकताच ‘एजे’ झाला भावूक
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात राकेशने ‘सर्वोत्कृष्ट जावई’चा पुरस्कार पटकावला. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील अभिराम जहागीरदार ऊर्फ एजेच्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे राकेशला कलाविश्वात 25 वर्षे पूर्ण झाली. हिंदी सिनेसृष्टीत काम केल्यानंतर त्याने मराठी मालिकेत पदार्पण केलं आणि पहिल्याच मालिकेतून इतकं यश मिळवलं. राकेशच्या करिअरमधील या खास क्षणी त्याची आई त्याच्यासोबत होती. मंचावर आईला पाहून राकेशसुद्धा भावूक झाला होता.
मंचावर राकेशची आई म्हणाली, “राकेशच्या करिअरची नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. झी मराठी या वाहिनीलाही 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 25 वर्षांत राकेशने हिंदी मालिका, चित्रपट आणि शोजमध्ये काम केलं होतं. त्याने मराठी मालिकेत काम करावं, ही माझी इच्छा होती. त्यामुळे माझ्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्याने मला वचन दिलं होतं की तो मराठी मालिकेत काम करणार. आज त्याला मिळालेलं हे यश पाहून मला खूप आनंद होतोय. त्याने मला खूप मोठं गिफ्ट दिलंय.” यावेळी राकेशच्या आईच्या हातात एक डायरी पाहून सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे त्यांना त्याबद्दल विचारतो. तेव्हा त्या सांगतात, “मी स्वत: राकेशची खूप मोठी फॅन आहे. मला त्याचा ऑटोग्राफ हवा आहे.” आईचे हे शब्द ऐकून राकेश भावूक होतो आणि आईला मिठी मारतो.
यावेळी राकेशची आई त्याच्या आणि एजेच्या स्वभावातील फरकसुद्धा सांगते. “एजेचं जसं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, तसंच राकेशचंही त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. एजेला सगळ्या गोष्टी परफेक्ट आणि स्वच्छ लागतात. राकेशलाही सगळ्या गोष्टी तशाच परफेक्ट आणि टापटीपपणा लागतो. फक्त एकच गोष्ट राकेशची वेगळी आहे, ती म्हणजे तो कधीच वेळ पाळत नाही”, असं त्या सांगताच समोर बसलेली शर्मिष्ठा राऊतसुद्धा ही गोष्ट मान्य करते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List