खाऊगल्ली – चला ढाब्यावर जेवू!
>> संजीव साबडे
दिवाळीत फराळाच्या पदार्थांचा इतका मारा होतो की, ते नकोसे होतात. काही तरी वेगळं, चमचमीत खाण्याची इच्छा होते. घरी रोज काम करणाऱ्यांची कंबर मोडलेली असते आणि नोकरदारांना हे चार दिवस तरी काहीच न करण्याचे हवे असतात. म्हणजे किमान एक वेळ बाहेर जाऊन जेवू. अशावेळी नेहमीच्या रेस्टॉरंटऐवजी वेगळं ठिकाण म्हणजे पंजाबी ढाबा.
धनत्रयोदशी परवा असली तरी मनातली दिवाळी आजच सुरू झाली आहे. एक तर सुट्टीचा दिवस आणि आठवडाभर वातावरण दिवाळीचंच. या वर्षी महिनाअखेरीस दिवाळी आली असली तरी अनेकांचा यंदा पगारही झाला असेल किंवा दोन दिवसांत होईल. यंदा बोनसच्या वा लवकर पगाराच्या बातम्या दिसत नसल्या तरी दिवाळीचे कंदील, विजेच्या माळा, पणत्या, रांगोळ्या, फटाके, मिठाई, तिखट फराळ यांनी सारी शहरं सजून गेली आहेत. कपडय़ांच्या दुकानांबाहेर सेलचे फलक लागलेत. दुचाकी, चारचाकी, गृहपयोगी वस्तू, सोनं व घर खरेदीच्या जाहिराती वर्तमानपत्रं व टीव्हीवर दिसू लागल्या आहेत आणि अनेकांनी खरेदी सुरूही केली आहे. बऱयाच घरात दिवाळीतील फराळ बराचसा तयार असून आजच्या रविवारी तो पूर्ण करायचा असेल. जे घरी फराळ करू शकत नाहीत, ते विकत आणतील.
दिवाळीत घरातला, शेजाऱया-पाजाऱयांकडचा आणि मित्र-मैत्रिणींच्या घरचा फराळ खाणं हमखास होतं. त्याची गंमत म्हणजे तो होई वा आणेपर्यंत त्याचं कौतुक, उत्कंठा असते. यांचे लाडू, त्यांच्या चकल्या, अमक्याच्या करंज्या, अनारसे मस्त झाल्याची चर्चा असते. पण नंतर यांचा इतका मारा होतो की, ते नकोसे होतात. काही तरी वेगळं, चमचमीत खाण्याची इच्छा होते. घरी रोज काम करणाऱयांची कंबर मोडलेली असते आणि नोकरदारांना हे चार दिवस तरी काहीच न करण्याचे हवे असतात. म्हणजे किमान एक वेळ बाहेर जाऊन जेवू. बऱयाचदा रेस्टॉरंटमध्ये जाणं होतं. त्यामुळे मस्तपैकी पंजाबी ढाबा. वेगळी ठिकाणं हवीत.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, डहाणू, अंबरनाथ, बदलापूर आणि इतरत्रही असंख्य ढाबे सुरू झाले आहेत. रेस्टॉरंटपेक्षा तिथलं वातावरण वेगळं असतं, चव अस्सल असते आणि मस्तही असते. काही शाकाहारी, तर काही दोन्ही प्रकारचे प्रकार देणारे. मुंबईकरांना माहीत असलेला जुना म्हणजे प्रीतम ढाबा. मस्त जेवण, पण आहे खूपच महाग. मात्र परवडतील असेही अनेक आहेत. ठाण्याच्या लुईसवाडीत पप्पू का ढाबा चांगला आहे. तिथलं जेवण छान असतं, तिथे शाकाहारी व मांसाहारी तंदूर प्रकार मस्त मिळतात. पोखरण रोड, निळकंठ हाईट्सपाशी असलेला अंबरसारिया ढाबाही साधा व चांगला आहे. ठाणे शहराच्या पुढे दिवे अंजूरपाशी बॉम्बे नाशिक ढाबाही उत्तम जेवण देणारा आहे. मूलतः ढाब्यावरील भाज्या व कोणताही पदार्थ करण्याची पद्धत रेस्टॉरंटपेक्षा वेगळी असते. त्यामुळे तिथे बसून जेवण आल्हाददायक वाटतं. पुढे कल्याणमध्ये लाल चौकी भागात एमएच 05 कल्याण व आधारवाडी परिसरातील फ्रेंडझ हे दोन ढाबे उत्तम जेवण आणि स्नॅक्स देतात. विक्रोळीला टागोर नगर परिसरात पंजाब तडका व भांडुपला मित्रां दा धाबा हेही सहकुटुंब जाण्यायोग्य आहेत. सायन कोळीवाडा भागात असंख्य लहान-मोठे ढाबे असले तरी लोक तिथे कुटुंबासह जायला टाळतात. दक्षिण मुंबईत प्रशस्त ढाबे नाहीतच.
वांद्रे पश्चिमेला पाली गावात पापा पांचो ढाबा अस्सल आहे. याशिवाय एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या अंग्रेजी ढाब्याचा माहोल व जेवण दोन्ही मस्त, पण आहे बराच महाग. अंधेरी पश्चिमेला वर्सोवा भागात दिवानो दा ढाबा आणि लिंक रोडवरील प्रताप दा ढाबा महाग, पण अतिशय उत्तम आहेत. अंधेरी पूर्वेलाही एक अंग्रेजी ढाबा महाकाली गुंफा भागात आणि उत्तम दा ढाबा सेव्हन हिल्स हॉस्पिटलजवळ आहे. मालाड पश्चिमेला चिंचोली भागातील साकिरा दा ढाबा आणि मार्वे रोडवरील सई दरिया ढाबा हे जेवण व वातावरण यासाठी प्रसिद्ध आहेत. पण खरी चंगळ दहिसर ओलांडून पुढे वसईच्या दिशेला जाताना आहे. दारा दा ढाबा, एक्वा ढाबा, नायगावपर्यंत पुढे गेलात तर प्रतम दा ढाबा अशी रांगच दिसेल. मोकळं वातावरण, मस्त हवा, मुंबईबाहेर गेल्याचा आनंद आणि उत्तम जेवण हे सारं शक्य होतं तिथे.
पण तिथे जाण्याआधी बरोबरच्या इतरांना आणि स्वतला बजावून ठेवा. दिवाळीत मिठाया, तेलकट, फार फायबर नसलेलं, ज्यात कार्ब्स असलेलं खाल्लं जातं. म्हणून ढाब्यावर अशा खाद्यपदार्थांपासून दूर राहा. निष्कारण वजन, त्रास व आजार यांची ऑर्डर देऊ नका.
शाकाहारी जेवणात तेल, मसाले वगैरे तुलनेने कमी असतात, तरीही काळजी घ्यायला हवी. मांसाहारी मंडळींनीही ढाब्यावरचं जेवण एन्जॉय करताना तशीच दक्षता घेणं गरजेचं आहे. चिकन ग्रेव्ही वा मसाला याऐवजी विविध प्रकारचे कमी तिखट टिक्का खाणं उत्तम.
दिवाळीत इतकं सटरफटर खाल्यावर इथे तरी काळजी हवी. अन्यथा अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होतो, पोट बिघडतं, घसा धरतो वा सुस्तावल्यासारखं होतं. वजन वाढतं. मधुमेह वा रक्तदाबाचा आजार असणाऱया अनेकांना डॉक्टरांकडे जावं लागतं. म्हणून हा सल्ला. अर्थात तो मानणं वा न मानणं हे तुम्हीच ठरवायचं. या सल्ल्यामुळे खर्चही थोडा कमी होईल. ढाब्यावरचं जेवणही आता महाग झालं आहे. परवडतील असे छोटे ढाबेही खूप आहेत दोन्ही उपनगरात. ज्यांना ढाब्यापर्यंत जायचं नसेल त्यांनी घरीही अगदी साधा स्वयंपाक करावा आणि खावा. तो तर सर्वात मस्त!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List