प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा मलिकच्या घरातून 34 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी नेहाच्या मोलकरीणीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. नेहाच्या घरी काम करणारी शहनात शेख सध्या फरार आहे. मुंबईतील चार बंगला इथं राहणाऱ्या नेहाच्या घरी शुक्रवारी ही चोरी झाली. त्यावेळी नेहाची आई मंजू मलिक या जवळच्या गुरुद्वारामध्ये प्रार्थनेसाठी गेल्या होत्या. तर घरात मोलकरीण शहनाज एकटीच होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी ती कामावर परतलीच नाही. तिला वारंवार फोनकॉल्स केल्यानंतरही काही उत्तर न मिळाल्याने मंजू यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
मंजू यांनी त्यांचं कपाट तपासल्यानंतर त्यांना काही दागिने हरवल्याचं लक्षात आलं. संपूर्ण घरात शोध घेऊनही दागिने कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली. मंजू मलिक यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून सध्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करण्यात येत आहे. मंजू त्यांच्या बेडरुममध्ये एका उघड्या लाकडी ड्रॉवरमध्ये बॅगेत दागिने ठेवत असे. अनेकदा त्यांनी मोलकरीणीसमोर ते दागिने ड्रॉवरमध्ये ठेवले होते.
नेहाची आई मंजू या शुक्रवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास गुरुद्वाराला गेल्या होत्या. त्याच्याआधी शहनाज नेहमीप्रमाणे घरकाम करण्यासाठी आली होती. तिने बेडरुम आणि खिडकीच्या काचा पुसून स्वच्छ केल्या. यानंतर घराचं भाडं भरण्यासाठी पैशांची गरज असल्याचं तिने मंजू यांना सांगितलं. त्यावर मंजू यांनी तिला नऊ हजार रुपये अॅडव्हान्स दिले आणि तिला कामाबद्दलचे निर्देश दिल्यानंतर त्या गुरुद्वारासाठी निघाल्या होत्या. प्रार्थनेनंतर त्या नऊ वाजेपर्यंत घरी पोहोचल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शहनाजने कामावर येणं बंद केलं.
नेहा मलिक ही तिच्या पंजाबी म्युझिक व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे चार दहशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने विविध टीव्ही शोजमध्येही भाग घेतला आहे. सोशल मीडियावर ती ग्लॅमरस फॅशन कंटेट आणि लाइफस्टाइलविषयीचे रील्स पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List