लॉरेन्स बिष्णोईनंतर सलमानचा नवीन दुश्मन कोण? ‘पांड्या’ने का पाठवला धमकीचा मेसेज?
अभिनेता सलमान खानला सोमवारी (15 एप्रिल) पुन्हा धमकी आली. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी अधिक तपास केला असता एका मानसिक रुग्णाने हा धमकीचा मेसेज पाठवल्याचं समोर आलं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधील मानसिक रुग्णाला ताब्यात घेतलं आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आत वरळी पोलिसांनी धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याची ओळख पटवून दिली. मयंक पांड्या (२५) हा गुजरातमधील वडोदरा इथला रहिवासी आहे. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणेचा वापर करून पांड्याला त्याच्या वडोदरा इथल्या निवासस्थानी शोधून काढलं. “तो मानसिक आजारावर उपचार घेत असल्याने आम्ही त्याला नोटीस बजावली आहे आणि त्याला तपासात सहभागी होण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीला स्थानिक व्हॉट्स ॲप ग्रुपवर सलमान खान आणि गुंड लॉरेन्स बिष्णोई यांच्या वादाबद्दल माहिती मिळाली होती. तसंच वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यापूर्वीही धमकी आल्याचं समजलं होतं. त्यातून त्याने हा प्रकार केल्याचं सांगितलं आहे. तरुणाविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. मयंक पांड्याला तीन दिवसांत पोलिसांसमोर हजर राहून त्याची बाजू मांडावी लागेल.
वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्स ॲप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला होता. त्याबाबतची माहिती वरळी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. सलमानला घरात घुसून मारणार, तसंच त्याची गाडी बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी मेसेजमध्ये देण्यात आली होती.
याआधीही सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप नंबरवर धमकीचा मेसेज आला होता आणि आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला.
एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी हवेत गोळीबार केला होता. याशिवाय सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र लिहिण्यात आलं होतं. या घटनेनंतर सलमानने त्याच्या घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावली होती. शिवाय अत्यंत महागडी अशी बुलेटप्रूफ गाडीसुद्धा त्याने घेतली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List