Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेत डोंबिवलीमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने अशी या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी या घटनेत मृत्यू झालेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले ही घटना सांगताना चांगलाच भावुक झाला. त्याला पत्रकार परिषदेमध्ये अश्रू अनावर झाले.
हर्षल लेले भावुक
ही घटना सांगताना हर्षल लेले चांगलाच भावुक झाला. दहशतवाद्यांना शूट अँड साईट करा अशी मागणी त्याने यावेळी केली आहे. त्यावेळी तिथे नेमंक काय घडलं याचा थरार त्याने सांगितला आहे.
माझ्या समोर एक मामा हेमंत जोशी यांना गोळी मारली, त्यानंतर दुसरे मामा अतुल मोने यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला जवळ घेतलं. त्यावेळी दहशतवादी त्यांना म्हटले की त्यांना सोडून द्या, त्यांच्यावरही गोळीबार करण्यात आला. हिंदू कोण आहे ? असं विचारल्यानंतर वडिलांनी हात वर केला, त्यानंतर दहशतवाद्याने त्यांच्यावर गोळी झाडली. त्यांच्या डोक्यावर माझा हात होता, गोळी माझ्या हाताला चाटून गेली आणि त्यांच्या डोक्यात शिरली. काही मिनिटात सगळं शांत झालं. त्यानंतर मी स्थानिकांच्या मदतीने माझ्या आईला आणि भावाला घेऊन तेथून खाली उतरलो.
आम्ही एकूण नऊ जण होतो, त्यात माझी फॅमिली आणि दोन्ही मामाचे कुटुंब होते. वीस तारखेला आम्ही या ठिकाणहून निघालो होतो. अहमदाबादला आम्ही एक दिवस राहिलो आमची फ्लाईट अहमदाबादमधूनच होती. श्रीनगरला दुसऱ्या दिवशी पोहोचलो, तिकडं बायरोड पहलगामला आम्ही गेलो. त्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पहलगाम फिरण्यासाठी निघालो होतो, त्याचवेळी ही घटना घडली, असं हर्षल लेले याने म्हटलं आहे. यावेळी बोलताना हर्षल लेले चांगलाच भावुक झाला, त्याला अश्रू अनावर झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List