‘त्या’ सीनच्या शूटिंनंतर बिघडली अभिनेत्रीची तब्येत; उल्टी केली, शरीर थरथप कापू लागलं..
अभिनेत्री दिया मिर्झा आणि मोहित रैना यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘काफिर’ ही वेब सीरिज आता एका चित्रपटाच्या रुपात पुन्हा प्रदर्शित झाली आहे. 2019 मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. खऱ्या घटनांवर आधारित या सीरिजमध्ये एका पाकिस्तानी महिलेची कथा दाखवण्यात आली आहे, जी अनवधानाने नियंत्रण रेषा ओलांडते आणि नंतर भारतीयांकडून ताब्यात घेतली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिया सीरिजमधील तिच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या सीरिजमधील एका अत्यंत संवेदनशील सीनचा तिच्या मनावर आणि शरीरावर खोलवर परिणाम झाल्याचा खुलासा तिने केला.
‘काफिर’मध्ये दियाने कायनाज अख्तरची भूमिका साकारली आहे. चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेल्या कायनाजवर गुप्तहेर असल्याचा ठपका लावला जातो आणि त्यानंतर तिला भारतात तुरुंगात डांबलं जातं. तुरुंगात असतानाच कायनाज मुलीला जन्म देते. ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत दिया म्हणाली, “मला आजही त्या बलात्काराच्या सीनचं शूटिंग आठवतंय. माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. त्या सीनचं शूटिंग संपल्यानंतर माझं शरीर थरथर कापत होतं. मी उल्टी केली. संपूर्ण सीन शूट झाल्यानंतर मला उल्टी झाली. भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या इतकं कठीण ते दृश्य होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या सीनमध्ये सर्वस्व झोकून काम करता, तेव्हा तुम्ही ती भूमिका जणू जगत असता. त्या भूमिकेच्या सर्व भावना तुम्हाला जाणवू लागतात.”
कायनाजची भूमिका साकारताना मी स्वत: एक आई होण्यापूर्वी आईपण अनुभवलं होतं, अशीही प्रतिक्रिया दियाने दिली. दिया वेब सीरिजमधील त्या भूमिकेला अक्षरश: जगली होती. ‘काफिर’ची कथा ही शेहनाज परवीन या पाकिस्तानी महिलेच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. अनवधानाने नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे शहनाज या भारतात आठ वर्षे तुरुंगात होत्या. यामध्ये मोहित रैनाने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. कायनाजला न्याय मिळवण्यासाठी आणि तिला स्वतंत्र करण्यासाठी तो तिच्या बाजूने लढतो. या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हीच सीरिज एका चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List