‘फुले’ चित्रपटाच्या वादावर राज ठाकरेंची भूमिका काय? ट्रेलर पाहून म्हणाले..
‘फुले’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अनंत महादेवन आणि त्यांच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यासाठी ते राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले होते. या भेटीदरम्यान यांनी चित्रपटासंदर्भात चर्चा केली. ‘फुले’ चित्रपटाबाबत राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे हे त्यांनी जाणून घेतलं. यावेळी त्यांना चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा दाखवण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचं कार्य या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले, “त्यांना ऐतिहासिक गोष्टींबद्दलची खूप माहिती आहे. त्यांनी चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा पाहिला. तसंच हा चित्रपट बरोबर असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. फुले हा चित्रपट लवकरात लवकर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला पाहिजे यावर आमचं बोलणं झालं. त्यांना बॅनर दाखवला असता तो कसा असावा याविषयी त्यांनी सांगितलं. या चित्रपटातील कोणत्याच सीनवर कात्री चालवण्यात आलेलं नाही. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी आम्हाला आणखी प्रोत्साहन दिलं. सर्व सीन्स बरोबर लिहिले आहेत, असंदेखील ते म्हणाले. जे इतिहासात घडलंय, तेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे फक्त ट्रेलर पाहून त्यावर टीका करू नका, संपूर्ण चित्रपट पाहून प्रतिक्रिया द्या.”
याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे म्हणाल्या, “फुले चित्रपटाच्या टीमने राज ठाकरेंची भेट घेतली. चित्रपटात खरा इतिहास दाखवला असेल तर काहीच बदल करायची गरज नाही. बिनधास्त चित्रपट प्रदर्शित करा. फुलेंच्या जयंतीदिनीच हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता, असंदेखील राज ठाकरेंनी म्हटलंय. यात कोणत्याही जातीचं राजकारण नाही. महापुरुषांना जातीच्या राजकारणात का आणत आहात असा राज ठाकरे यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक मोठे विषय आहेत. असे इतर विषय घेऊन त्या मुख्य विषयांना बगल देण्याचं काम केलं जात आहे.”
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List